एमपीएससीतील अपयशानंतर वकिलीचं शिक्षण; पण वडिलांनीच उच्च शिक्षित मुलाला…, कारण काय?

तो उच्चशिक्षित होता. दहा वर्षे एमपीएससीसाठी प्रयत्न करुनही त्याला यश आले नाही. अखेर त्याने कोल्हापुरात येऊन वकिलीचं शिक्षण सुरु केलं. पण अचानक वडिलच त्याच्या जीवावर उठल्याने एकच खळबळ उडाली.

एमपीएससीतील अपयशानंतर वकिलीचं शिक्षण; पण वडिलांनीच उच्च शिक्षित मुलाला..., कारण काय?
घरगुती वादातून बापाने मुलाला संपवले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 5:30 PM

कोल्हापूर : घरगुती कारणातून पित्यानेच आपल्या उच्चशिक्षित तरुण मुलाची हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अमरसिंह थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत ही हत्येची घटना घडली. पोलिसांनी 24 तासात तरुणाच्या हत्येचा छडा लावला. हत्येचे कारण उघड होताच सर्वांनाच धक्का बसला. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिल आणि भावाने तरुणाची हत्या केली. कोल्हापूर एलसीबीनं दोघा आरोपींना अटक केली आहे. थोरात कुटुंबीय हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे रहिवासी आहेत. वडील दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आयफोनसाठी पैसे मागितल्याने वादातून हत्या

मयत अमरसिंह थोरात दहा वर्ष पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होता. त्यानंतर घरातून त्याचा अभ्यास सुरू होता. मात्र यश न आल्याने कोल्हापुरात त्याने वकिलीचं शिक्षण सुरू केले. दरम्यान अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात वारंवार भांडणं होत होती. तसेच अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली होती. मात्र वडिलांनी नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. याच रागातून वडिलांनी घरात अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. यामुळे अमरसिंहला प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वडील आणि भावाला अटक

मुलाचा मृत्यू झाल्याने घाबरून वडिल आणि भावाने मृतदेह रस्त्याच्या शेजारी टाकला. रस्त्याच्या शेजारी मृतदेह पडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपास सुरु करत मृतदेहाची ओळख पटवली. घरगुती कारणातून वडिल आणि भावानेच तरुणाची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या आहेत.