
सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक झाली आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास त्याला शेतातून अटक करण्यात आली. पुण्यात शिवशाही बसमध्ये या नराधमाने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्या शिवाय पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपायोजना करणार? त्या बद्दलही सांगितलं.
“आरोपीला कळणार नाही अशा पद्धतीने गुप्तपणे आमचा शोध सुरू होता. तो लवकरच गावात सापडेल अशी आशा होती. पण तो सापडत नव्हता. त्यातच आम्ही त्याचा शोध घेत असल्याचं त्याला कळलं. त्यामुळे आम्ही ओपन ऑपरेशन सुरू केलं” असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. “22 जानेवारी 2024 रोजी मोबाईल चोरीची तक्रार आली होती. 2019 मध्ये त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल झाले” असं पोलिसांना सांगितलं.
पोलीस आता कुठल्या गुन्हेगारांची डिटेल्स काढणार?
“अहिल्या नगरात एक गुन्हा असल्याने अशा प्रकारचा गुन्हा करेल हे आमच्या रडारवर नव्हतं. आता ज्या गुन्ह्यावर एकापेक्षा जास्त विनयभंग, किंवा एका पेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची डिटेल्स काढण्यात येत आहे. अशा लोकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे” असं अमितेश कुमार म्हणाले.
त्याच्या गळ्यावर मार्क
“प्राथिमक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचं तो सांगतो” असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? अशी चर्चा सुरु झालीय.