संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देणारे हवालदार गायब, जालना पोलिसात खळबळ

| Updated on: Sep 02, 2021 | 11:11 PM

जालन्यात एका पोलीस हवालदाराच्या बेपत्ता होण्याने एकच खळबळ उडाली आहे. या हवालदाराने बदलीसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओत हवालदाराने पोलीस अधीक्षकांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देणारे हवालदार गायब, जालना पोलिसात खळबळ
पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी
Follow us on

जालना : जालन्यात एका पोलीस हवालदाराच्या बेपत्ता होण्याने एकच खळबळ उडाली आहे. या हवालदाराने बदलीसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकला होता. त्या व्हिडीओत तो स्वत: बोलताना दिसत होता. या व्हिडीओत हवालदाराने पोलीस अधीक्षकांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आपली संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहन करु, असं पोलीस हवालदार म्हणाला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण तरीही त्याच्या या व्हिडीओची दखल घेण्यात आली नाही. त्याची खरंच संध्याकाळपर्यंत बदली न झाल्याने संबंधित पोलीस हवालदार बेपत्ता झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन विनंती करत बदलीचा अर्ज केला होता. मात्र आत्तापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी आज एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ पाठवला. त्यामध्ये “माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन”, असा इशारा त्यांनी दिला होता.

पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?

“पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो. त्यांनी आमच्या बदलीचं करतो म्हणून सांगितलं. पण आमची बदली केली नाही. आम्ही आत्मदहन करत आहोत. आम्हाला फक्त आश्वासन दिलं. त्यानंतर दोन-तीन हदलीच्या याद्या निघाल्या. पण आमचं नाव नाही. आमची संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही तर आम्ही आत्मदहन करत आहोत”, असं पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी व्हिडीओत बोलताना दिसले.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

गेल्या महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक फेरबदल

गेल्या महिन्यात 24 ऑगस्टला राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते. भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसह पोलीस उपमहानिरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर बदल्या करण्यात आल्या होत्या. बदली किंवा पदोन्नती असं या बदल्याचं स्वरुप होतं. अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसाठी 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. पोलीस उपमहानिरीक्षक पदांसाठी 16 आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.

राज्यातील आणखी 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, याआधी जुलै 2021 मध्ये राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिलीय. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली.

हेही वाचा :

मुंबईतून तडीपार, ‘त्या’ दोन महागड्या मोबाईलने सराईत चोरट्याचे बिंग फोडले, अनेक गुन्ह्यांचा उकल

पुण्यात भरदिवसा घरफोडी, चोरट्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या तरुणावर गोळीबार, भयानक थरार