बायकोची क्रूर हत्या, दिलं 1.20 कोटी भाडं, तब्बल 26 वर्षे….मारेकऱ्याचं नाव समोर येताच बसला जबर धक्का!

सध्या सर्वांनाच अचंंबित करणारा हत्येची एक क्रूर घटना समोर आली आहे. या घटनेतील मारेकऱ्याचा तब्बल 26 वर्षांनी शोध लागला आहे. खरा मारेकरी समोर येताच महिलेच्या पतीला धक्का बसला आहे.

बायकोची क्रूर हत्या, दिलं 1.20 कोटी भाडं, तब्बल 26 वर्षे....मारेकऱ्याचं नाव समोर येताच बसला जबर धक्का!
crime news
| Updated on: Nov 10, 2025 | 3:33 PM

काही काही हत्या प्रकरणं ही चकीत करणारी असतात. पोलिसांनी आपली पूर्ण ताकद, कौशल्ये पणाला लावली तरीही मारेकऱ्याचा शोध लागत नाही. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गेल्या 26 वर्षांपासून एका महिलेच्या हत्येचा शोध सुरू होता. आता मात्र तो संपला आहे. विशेष म्हणजे आपल्या पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागावा यासाठी खून झालेल्या महिलेच्या पतीने तब्बल 26 वर्षे एका खोलीचं भाडं दिलेलं आहे. आपल्या पत्नीच्या मारेकऱ्याला पकडलं जावं म्हणून त्याने किरायाच्या घराचे तब्बल 1.20 कोटी रुपये भाडे दिले आहे. कोट्यवधी रुपये गेले असले तरी आता या व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागला असून त्याला धक्काच बसला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार समोर आलेला हा प्रकार जपानमधील आहे. या रिपोर्टनुसार 13 नोव्हेंबर 1999 रोजी नामिको ताकाबा नावाच्या एका महिलेची क्रूर हत्या करण्यात आली होती. या महिलेची हत्या झाली तेव्हा तिच्यासोबत तिचा छोटा मुलगा होता. परंतु मारेकऱ्याने या छोट्या मुलाला काहीही केलेले नव्हते. सातोरु ताकाबा असे हत्या झालेल्या महिलेच्या पतीचे नाव आहे. नामिको हिची हत्या सातोरू याने हत्या झालेल्या घराला कुलूप लावले होते. पत्नीचा खून कोणी केला हे समजावे यासाठी त्याने घरातील सर्व वस्तू जशाच्या तशा ठेवल्या होत्या. फरशीवरील रक्ताचे डाग, अस्तव्यस्त पडलेल्या सामानाला त्याने हातही लावला नव्हता. यातून एखादा पुरावा सापडेल आणि मारेकऱ्यापर्यंत पोहोचता येईल, अशी आशा सातोरु याला होती. याच आशेपोटी त्याने तब्बल 26 वर्षे खून झालेल्या खोलीचे एकूण 2.2 कोटी येन म्हणजेच साधारण 1.20 कोटी रुपये भाडे भरले. मधल्या काळात हे प्रकरण चर्चेत राहावे म्हणून तो माध्यमांना मुलाखती द्यायचा, पत्रकं वाटायचा.

जुनी मैत्रीणच निघाली गुन्हेगार

दरम्यान, या प्रकरणाचा छडा लागावा यासाठी पोलिसांनी 5000 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली. शेवटी मारेकरी एक महिला निघाली. विशेष म्हणजे ही महिला सातोरू ताकाबा याची जुनी मैत्रीण निघाली. तिचे नाव कुमिको यासुफुकू असे असल्याचे बोलले जात आहे. सातोरू आणि कुमिको हे एका शाळेत शिकले होते. कुमिकोला सातोरू फार आवडायचा. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिने सातोरू याला फुल आणि पत्र पाठवले होते. मात्र सातोरू याने तिला नकार दिला होता. आता 30 ऑक्टोबर 2025 रोजी कुमिको हिने आपला गुन्हा कबुल केला आहे. दुसरीकेड कुमिको हिनेच आपल्या पत्नीचा खून केल्याचे समोर आल्यानंतर सातोरूला धक्काच बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कुमिका हिच्या संपर्कात होता. परंतु ती मारेकरी असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. आता कुमिको हिने गुन्हा मान्य केला असून पोलीस पुढची प्रक्रिया करत आहेत.