
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लहान मुलांना पळवण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कल्याण पश्चिममधील कोळीवाडा परिसरात अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमध्ये एका अडीच वर्षांच्या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो फसला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी करण पूरीमणी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
रिक्षाचालक अजहर मणियार (फजल) यांचा अडीच वर्षांचा मुलगा घराच्या दारात उभा होता. त्याची आई घरात जेवण करत होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याला जबरदस्तीने उचलले. यानंतर त्या मुलाने जोरात रडायला सुरुवात केली. यामुळे आजूबाजूच्या लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. हा व्यक्ती या परिसरात कधीही दिसला नव्हता, त्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांनी त्या व्यक्तीला मुलाला उचलण्यामागचे कारण विचारले. त्यावर त्याने काहीही उत्तर दिले नाही. यानंतर तो घाबरून मला सोडा, मला जाऊ द्या अशी विनवणी करू लागला.
यानंतर नागरिकांच्या सर्व प्रकार लक्षात आला. हा व्यक्ती मुलाला चोरण्यासाठी आला होता, हे समजल्यानंतर काही संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतरांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या मदतीने त्या व्यक्तीला रंगेहाथ पकडून बाजारपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
आरोपी सोलापूरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव करण पूरीमणी असून तो सोलापूर येथील शास्त्रीनगरचा रहिवासी आहे. त्याच्याकडे दादर ते सोलापूरचे रेल्वे तिकीट आढळून आले. ज्यामुळे तो सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे अन्य कोणतीही वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी करण पूरीमणी विरोधात मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
करणने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी सोलापूर येथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. ही व्यक्ती कोण आहे, मुलाला का घेऊन जात होता, मुलाशी त्याचे काही नाते आहे का किंवा तो मुलांची चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य आहे का, या सर्व बाजूंनी कल्याण बाजारपेठ पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.