कल्याण रेल्वे स्कायवॉकवर चोरट्याची दहशत, मजुरावर चाकू हल्ला करत लुटले पैसे

| Updated on: Apr 06, 2024 | 10:34 AM

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य पादचारी, प्रवाशांना या गुन्हेगारीचे सर्वाधिक चटके बसत आहेत. मागील सहा महिन्यांत अनेक लुटमारीच्या घटना कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात घडल्या आहेत. त्यातच आता आणखी एक गुन्ह्याची घटना समोर आली आहे

कल्याण रेल्वे स्कायवॉकवर चोरट्याची दहशत, मजुरावर चाकू हल्ला करत लुटले पैसे
Follow us on

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य पादचारी, प्रवाशांना या गुन्हेगारीचे सर्वाधिक चटके बसत आहेत. मागील सहा महिन्यांत अनेक लुटमारीच्या घटना कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात घडल्या आहेत. त्यातच आता आणखी एक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. एका कष्टकरी मजुराला तीन चोरट्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर अडवले. त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याच्या जवळील दोन हजार रुपये लुटले आणि चोरटे फरार झाले.
खुशीराम मिना असे पीडित मजुराचे नाव असून या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात देत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशन परिसरात अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण आहे

नेमकं काय झालं ?

भिवंडी जवळील पडघा ढोलेगाव येथे राहणारा खुशीराम मिना हा इसम कल्याण, भिवंडी परिसरात मजुरीची कामे करून उपजिवीका करतो. गुरुवारी कल्याणमध्ये दिवसभर मजुरीचे काम केल्यानंतर रात्री खुशीराम मीना घरी जात होता. कल्याण पश्चिमेतील दरबार हॉटेल समोरील स्कायवॉकवरून भिवंडीला जाणारी रिक्षा किंवा इतर वाहन पकडण्यासाठी तो जात होता. त्यावेळी स्कायवॉकवर १६ ते १८ वयोगटातील तीन तरूणांनी त्याला अडविले. त्याच्यावर अचानक धारदार चाकूने हल्ला करून त्याला दुखापत केली.

अचानक घडलेल्या या हल्ल्याने खुशीराम घाबरला. त्याने या तरूणांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आरोपींनी पकडून ठेवले. त्याला बेदम मारहाण केली. त्यांला चाकूने गंभीर दुखापत करून खुशीरामने दिवसभर मजुरी करून मिळविलेले दोन हजार रूपये तिन्ही भामट्यांनी खुशीरामच्या खिशातून जबरदस्तीने काढून घेतले. मीना याने त्याचा प्रतिकार केला पण त्याचा उपयोग झाला नाही. तेथील कोणीही प्रवासी, पादचारी त्याच्या मदतीसाठी धावलं नाही. या घटनेमुळे हादरलेल्या खुशीरामने रात्रीच महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.