
Kalyan Crime Vishal Gawali : एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या आरोपी विशाल गवळीने कारागृहात असताना गळफास घेऊन आत्महत्ये केली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच आता त्याच्या भावाच्या दहशतीची काही प्रकरणं समोर येत आहेत. विशाल गवळीने आत्महत्या करून जीवन संपवले असले तरी तडीपार असलेला त्याचा भाऊ आकाश गवळी याची दहशत मात्र कायम असल्याची तक्रार कल्याणमधील स्थानिकांनी केली आहे.
विशाल गवळी याचा भाऊ आकाश गवळी हा तडीपार आहे. पोलीस रेकॉर्डमध्ये त्याची तडीपार अशी नोंद आहे. मात्र तडीपार असूनही त्याचे धमकीसत्र अद्याप चालूच आहे. याबाबत बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी तशी भीती व्यक्त केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीदेखील विशाल गवळी याच्या आत्महत्या नंतर गवळी बंधूंच्या दहशतीविरोधात पोलीस ठाण्यात निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बलात्काराच्या प्रकरणात नाव आल्यानंतर विशाल गवळी यांच्या दोन भावांना तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही त्यांची दादागिरी थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशाल गवळी याला अटक केल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांच्या भावाचे असलेले मंडप डेकोरेशन न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कल्याण पूर्वमधील नंदादीप परिसरात काही सोसायटीमधील लोकांनी रामनवमी व साई भंडाराच्या आयोजनासाठी मंडप डेकोरेटर शोधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र जसे या सोसायटीतील नागरिक डेकोरेशन व मंडप टाकणाऱ्या ठेकेदारांकडे जात तसे त्या ठेकेदाराला विशाल गवळी याचा भाऊ आकाश गवळी फोन करायचा. तसेच मंडप टाकला तर मारून टाकेल, अशा प्रकारची धमकी द्यायचा.
या धमक्यांमुळे मंडप टाकण्यासाठी स्थानिक नागरिकांना माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची मदत घ्यावी लागली होती. त्यांच्या मदतीनेच नागरिकांमना मंडप टाकून आपले कार्यक्रम करावे लागले. आज (13 एप्रिल) विशाल गवळीने आत्महत्या केल्यानंतर या सर्व नागरिकांनी त्यांच्या भावाचीदेखील दहशत मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांना विशाल गवळीच्या भावांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “विशाल गवळी याने आत्महत्या केली असली तरी कल्याण पूर्वेची जनता समाधानी नाही. त्याला भर चौकात फाशी देण्यात यायला हवी होती, अशी नागरिकांची भावना आहे. त्याच्या भावांची दहशत अजूनही सुरू आहे. त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. विशाल गवळी याच्या भावांबाबत पीडित मुलीच्या वडिलांनीही तक्रऐार केली आहे. गवळीच्या भावांची दहशत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.