Kalyan : आवडली म्हणून महिलेचा पाठलाग, कल्याण रेल्वे स्थानकात असं काही घडलं की…

| Updated on: Jan 17, 2024 | 12:08 PM

कल्याण स्थानकावर एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिलांनी प्रवास करायचा तरी कसा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Kalyan : आवडली म्हणून महिलेचा पाठलाग, कल्याण रेल्वे स्थानकात असं काही घडलं की...
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 17 जानेवारी 2024 : कल्याण रेल्वे स्थानकात गेल्या आठवड्यात एका तरूणाला मोबाईल चोरीच्या आरोपावरून दोन तरूणांनी चोप दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता कल्याण स्टेशनवर आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण स्थानकावर एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिलांनी प्रवास करायचा तरी कसा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नेमकं काय घडलं ?

कल्याण जीआरपीच्या प्रभारी अर्चना दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही छेडछाडीची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. कल्याणच्या फलाट क्रमांक तीनवर एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी रोहित वरकटे नावाच्या आरोपी तरुणाने मुलीकडे आक्षेपार्ह नजरेने बघून तिला धक्काबुक्की केली. त्यामुळे तरुणी घाबरत आपला बचाव करण्यासाठी भीतीपोटी ही तरुणी फलाट क्रमांक तीन वरून सातवर लोकल ट्रेन पकडण्यासाठी गेली. मात्र या रोमिओने तिचा पिच्छा काही सोडला नाही. त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला आणि स्टेशनवरच तिची छेड काढली. अश्लील कृत्य करत तिचा विनयभंगही केला.

पोलिसांकडे घेतली धाव

यामुळे ती तरूणी भेदरली पण तिने हिंमत न हारता जीआरपीकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तेथील अधिकाऱ्यांनी आरोपी रोहित वरकटे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच लोहमार्ग पोलीस ॲक्शन मोड वरती येत लोहमार्ग पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शना खाली कल्याण लोहमार्गाच्या पोलीस हवालदार सुतार जगताप पोलीस नाईक विषे पोलीस शिपाई पाटण शेट्टी सुळे याचे पथक तयार करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मात्र स्टेशन परिसर छेडछाडीची ही पहिली घटना नसून याआधीही अनेक घटना घडल्या आहेत. पण अशा घटना घडत असताना स्टेशन परिसरात पोलीस नसल्याचे खंत प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. महिला प्रवांशाची सुरक्षा धोक्यात असून त्यांनी प्रवासी करावा तरी कसा असा सवाल संतप्त प्रवासी विचारत आहेत. सध्या या आरोपीला अटक करून कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.