
कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नसून आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 29 वर्षांच्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून आधी तिच्यावर बलात्कार करण्यात आलं. अएवढंच नव्हे तर तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपी प्रियकराला खडकपाडा पोलिसांनी तब्बल दीड महिन्याच्या अथक शोध मोहिमेनंतर अटक केली. कल्याण पश्चिमेतील फडके मैदान परिसरात पोलिसांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या. विनीत गायकर असे या आरोपीचे नाव असून तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
दीड महिन्यापूर्वी आरोपीने राजकीय बळाचा वापर करत तरुणीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी चौकशी करत याप्रकरणी पीडित मुलीची तक्रार घेतली आणि आरोपीवर बलात्कार ब्लॅकमेलिंग आणि अन्य गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर गायकर हा फरार झाला, अखेर दीड महिने त्याचा कसून शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आरोपीने या तरूणीसह अन्य किती मुलींसोबत अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं आहे याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, पीडित तरुणी आणि आरोपी विनीत गायकर यांच्यात प्रेमसंबंध होते. विनीतने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले इतकेच नाही तर तिचे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपीने तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली. एके दिवशी तरुणीच्या हाती आरोपीचा मोबाईल लागला. त्यामध्ये तिचेच नव्हे, तर इतर मुलींचेही अश्लील व्हिडिओ सापडले. तरुणीने हा मोबाईल आपल्याकडे ठेवला आणि त्याच्यासोबत आपले प्रेम संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.
मात्र आपला मोबाईल परत मिळवण्यासाठी आरोपी विनीत गायकर याने राजकीय बळ तरुणीवर मोबाईल चोरीचा खोटा आळ आणला आणि पोलिसांकडे जाऊन तिची तक्रार केली. तिच्यावर दजबाव आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी तरुणीची चौकशी केल्यानंतर आणि तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ हाती लागल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले.
यानंतर पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेत आरोपी विनीत गायकर याच्यावर ब्लॅकमेलिंग ,बलात्कारासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला होता. मात्र, खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू ठेवत, तब्बल दीड महिन्यानंतर कल्याण पश्चिम येथील फडके मैदान परिसरात सापळा रचून आरोपी विनीत गायकर याच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.