ड्रायव्हरनेच मालकाची कशी लूट केली? बड्या बिल्डरला ड्रायव्हरनेच लुटल्याने खळबळ

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. नवे पोलीस अधिकारी नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यात यशस्वी होतील का ? याची उत्सुकता नाशिककरांना लागून आहे.

ड्रायव्हरनेच मालकाची कशी लूट केली? बड्या बिल्डरला ड्रायव्हरनेच लुटल्याने खळबळ
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 17, 2022 | 10:08 AM

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर गुन्हेगारीच्या घटनांनी एक प्रकारे आव्हान निर्माण केले आहे. नाशिकमध्ये खून, दरोडे, घरफोड्या आणि पिस्टल बाळगाण्याच्या घटना समोर येत आहेत. असे असताना नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या छातीला बंदूक लावून धमकावत 66 लाखांची रोकड लंपास केली आहे. याबाबत नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कारचालकासह दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले 72 वर्षीय कन्हैयालाल मनवानी यांची लूट त्यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या 26 वर्षीय देविदास शिंदे आणि त्याच्या ओळखीतील एका व्यक्तीने केली आहे. दोघांनी रोकडसह कार पळवून नेल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. बड्या बिल्डरला लुटल्या प्रकरणी व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लुटारू ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नाशिकच्या होलाराम कॉलनी येथील बांधकाम व्यावसायिक कन्हैयालाल चेतनदास मनवाणी हे हॅपीहोम डेव्हलपर्स ह्या त्यांच्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते.

मनवाणी हे कारमध्ये बसण्यासाठी येत असतांना त्यांच्या हातात कापडी पिशवी होती, त्यात पैसे आहेत याची खात्री मनवाणी यांच्या कारचालकाला आलेली होती.

कुलकर्णी गार्डन येथून घराच्या दिशेला जाणारी कार त्याने अचानक शरणपुर रोड वळणावर अचानक थांबवली आणि कारमध्ये एक युवक बळजबरीने शिरला.

मनवाणी कारचालक आणि त्याचा मित्र असलेला व्यक्ती कारमध्ये शिरताच त्यांना हटकावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी कारचालक याने कारचा वेग वाढवला आणि दुसऱ्याने कमरेला असलेली पिस्टल मनवाणी यांच्या डोक्याला लावली.

यावेळी मनवाणी आरडाओरड करू लागले होते, कुठे घेऊन चालला आहे, घर इकडे आहे ना ? याला का बसवलं ? असे प्रश्न करू लागले पण बंदूक लावलेल्या व्यक्तीने बडबड बंड कर नाहीतर ठोकून देऊ अशी धमकी दिली.

काही मिनिटांत कार मुंबईच्या दिशेने रवाना झाली, जैन मंदिर परिसरात मनवाणी यांच्याकडील पैशांची पिशवी हिसकावून घेत गाडीच्या खाली उतरून दिले, आणि दोघांनी पोबारा केला.

मनवाणी कुटुंबाशी संपर्क करून पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हाही दाखल झाला आहे, सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक शहर पोलिसांचे पथक तपासही करत आहे.