चोरी करायला आलेल्या तरुणाचा मृत्यू, साथीदारही बघत राहिले, अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार

| Updated on: Mar 07, 2022 | 2:28 PM

योगेश रावसाहेब विघे (20, रा. चिकलठाण ता. राहुरी ) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे

चोरी करायला आलेल्या तरुणाचा मृत्यू, साथीदारही बघत राहिले, अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

अहमदनगर : चोरीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी करताना अचानक गळफास बसल्याने त्याला प्राण गमवावे लागले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिंदोंडी शिवारात हा प्रकार घडला. चोरट्यांची टोळी शिवारात घुसली होती, मात्र त्याच्यासोबत असलेले इतर चोरही त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. या घटनेनंतर चोराच्या साथीदारांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या विचित्र घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

योगेश रावसाहेब विघे (20, रा. चिकलठाण ता. राहुरी ) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. विशाल राजेंद्र पंडित (वय 18), आदित्य अनिल सोनवणे (वय 20, दोघेही रा. शिंदोडी ता. संगमनेर) संकेत सुभाष दातीर (वय 26, रा. प्रिंप्रिलौकी ता.संगमनेर), सरफराज इक्बाल शेख (रा. रामगड ता. श्रीरामपुर) आणि अन्य एक अल्पवयीन मुलगा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.

काय आहे प्रकरण?

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या योगेशसह सर्व चोरटे टेम्पो आणि इनोव्हा कारने चोरी करण्यासाठी शिंदोडी शिवारात गेले होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास योगेशला चोरी करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती विजेच्या टॉवरवर चढवण्यात आलं. टॉवरवरील विजेच्या अॅल्युमिनियमच्या तारा त्याला तोडायला सांगितल्या.

कमरेची दोरी गळ्याभोवती आवळली

विजेच्या टॉवरवर चढताना योगेशने आपल्या कमरेभोवती एक दोरी बांधली होती. मात्र तारा कापताना योगेशचा तोल गेला आणि कमरेभोवती आवळलेल्या दोरखंडाच्या त्याच्या गळ्याला फास बसला. साथीदारांनी त्याची मदत करण्याआधीच त्याची हालचाल थांबली होती.

योगेशला खाली उतरवून उपचारासाठी लोणी येथील पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच योगेशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. लोणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस, मनमाडला दुकाने फोडली, घरात घुसून ऐवज लंपास, मंगळसूत्रही ओरबाडले

अजिंठा पर्यटक केंद्रात दरोडेखोरांचा सात तास थरार, ट्रान्सफॉर्मर फोडून ऑइल, कॉपरची चोरी!

कोल्हापूरच्या ‘नादखुळा’ पोरांमुळे बाईकचोरांचे ‘टांगा पल्टी घोडे फरार’, दोन सराईत चोर जाळ्यात