
राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील वकिल चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत महिलेने सिद्धांत शिरसाट याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
जान्हवी सिद्धांत शिरसाट असं या महिलेने आपलं नाव लावलं आहे. सिद्धांतने जान्हवीशी लग्न केलं होतं, असा वकिलामार्फत दावा करण्यात आला आहे. जान्हवीला नांदवायला त्यांनी नकार दिला. तिने छत्रपती संभाजी नगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिलं नाही. तिला मुंबईत रहायला सांगितलं. तिथे महिलेवर अन्याय, अत्याचार करण्यात आला असा वकिल चंद्रकांत ठोंबरे यांनी आरोप केलाय. संजय शिरसाट हे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संजय शिरसाट यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तिसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध
“चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी जान्हवीसोबत सिद्धांतने लग्न केलं. फॅमिलीसोबत रितीरिवाजानुसार लग्न केलं. दोन वर्ष चांगले राहिले. पण नंतर सिद्धांतच तिसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष सुरु केलं. मानसिक छळ सुरु केला. इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा. तिला संभाजी नगरला कधीच येऊ दिलं नाही. संभाजी नगरला आलीस, तर तंगडं तोडू अशी धमकी दिली. सात दिवसांच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे. अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करु” अशा इशारा जान्हवीचे वकिल चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे.