आई, माझी काही चूक नाही… भररस्त्यात अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून पेटवलं

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 124 (1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

आई, माझी काही चूक नाही... भररस्त्यात अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून पेटवलं
crime scene
| Updated on: Mar 05, 2025 | 11:48 AM

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून अंधेरीमध्ये असाच एक भयानक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने तिला मित्राला भेटण्याची मनाई केली. मात्र यामुळे संतापलेल्या मजनूने रागाच्या भरात त्या मुलीलाच दुखापत केली. त्याने अवघ्या 17 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थेट पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. यामुळे प्रचंड खळबळ माजी आहे. या दुर्दैवी घटनेत दीपाली शेंडगे (नाव बदलले आहे) ही मुलगी 60 टक्के भाजली असून ती कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते.

रात्री उशिरा आईला फोन आला आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आई-वडिल आणि तीन भावंडासोबत अंधेरी पूर्व भागात राहते. तिचे वडिल चालक असून तिचा भाऊ खासगी कंपनीत कामाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून दीपाली ही आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितूला ओळखते. मात्र सुमारे सहा महिन्यांपूर्वी, तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने दिपालीच्या आईला त्यांच्याबाबत सांगितलं. ती जीतूसोबत आसपासच्या परिसरात फिरत असल्याचे आईच्या कानावर आलं.

त्यानंतर दीपालीच्या आईने जितूला समज दिली आणि तिला भेटण्यास मनाई केली. पण यामुळे तो चिडला . घटना घडली त्यादिवशी, रविवारी रात्री उशीरा दिपालीच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा फोन आला. दीपालीवर कोणीतरी पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचे सांया व्यक्तीने फोनवरून सांगितलं.

आईने धाव घेतली पण

ते ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दीपाली अर्धवट भाजलेल्या अवस्थेत दिसली. “आई, माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला जाळले.”, असे सांगत दीपाली खाली कोसळली. वेदनांनी ती अतिशय व्हिवळत होती. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिला उपचारांसाठी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती 60 टक्के भाजली आहे.

या घटनेत आरोपी जीतूही गंभीर भाजला असून त्यालाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दीपालीच्या आईच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 124 (1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.