
ही हृदयद्रावक स्टोरी वाचून तुम्हाला धक्का बसेल. एक माता कसं आपल्याच मुलांचा गळा दाबू शकते, असाही प्रश्न तुम्हाला पडेल. या मातेने तीन पोटच्या मुलांचा जीव घेतला. त्यापूर्वी तिने मुलांना ‘ट्विंकल, ट्विंकल, लिटिल स्टार आणि इट्सी बिट्सी स्पायडर,’ हे गात झोपवले. मग शांत झोपलेल्या मुलांना या मातेला का मारावसे वाटले, या सर्व प्रश्नांची उत्तर पुढे विस्ताराने जाणून घ्या.
अमेरिकेतील फिनिक्स मधून एक बातमी समोर आली आहे. ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. आपल्या तीन निष्पाप मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या एका क्रूर आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खरं तर अॅरिझोनामध्ये रेचल हेन्री नावाच्या महिलेने आपल्याच तीन निष्पाप मुलांची हत्या केली होती. 20 जानेवारी 2020 रोजी 27 वर्षीय हेन्रीने आपल्या तीन मुलांची झोपेत गुदमरून हत्या केली होती.
इथे आणखी हृदयद्रावक गोष्ट म्हणजे रेचल हेन्रीने आपल्या मुलांना ट्विंकल, ट्विंकल, लिटिल स्टार आणि इट्सी बिट्सी स्पायडर, हे गात झोपवले आणि त्यांची गळा दाबून हत्या केली. या क्रूर मातेने प्रथम आपली एक वर्षाची मुलगी मिराया हेन्रीहिची गळा दाबून हत्या केली.
यानंतर तिने आपला तीन वर्षांचा मुलगा झेन हेन्री याला पकडून दुसऱ्या खोलीत नेले आणि त्याचीही हत्या केली. शेवटी हेन्रीने आपली सात महिन्यांची मुलगी कॅटलिया रिओस हिची हत्या केली. तिन्ही मुलांना ठार मारल्यानंतर तिने सर्व मुलांचे मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून गाढ झोपेत असतील अशा पद्धतीने झोपवले.
हेन्री या ड्रग्जच्या व्यसनाधीन होत्या आणि त्यांनी नशेत असताना ही भयानक घटना घडवून आणली. ही घटना आपल्याला नेमकी आठवत नसल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. जास्त नशा केल्यामुळे आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असू शकतो, असे अनेक मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
हेन्री आपली तीन मुले आणि आत्याच्या पतीसोबत राहत होत्या. पण घटनेच्या वेळी आत्याचा पती बाहेर होता. घरी परतल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तपासाअंती पोलिसांनी आरोपी आईला तिन्ही मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
कोर्टाच्या सुनावणीदरम्यान हेन्रीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे न्यायालयाने तिला फासावर लटकवण्याऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण अत्यंत भयानक आणि निर्दयी आहे.