
मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : दिवाळी म्हटलं की लहान मुलांना सर्वात जास्त उत्सुकता असते ती फटाक्यांची.. फुलबाजी , भुईचक्रपासून ते मोठमोठा आवाज करणारे सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बपर्यंत… फटाक्यांची हौस प्रत्येकालाच असते. अँटॉप हिल परिसरातही तो चिमुकला मित्रांसोबत आनंदाने फटाकच फोडत होता. पण त्याच फटाक्यांचे आमिष दाखवून एका नराधमाने त्याच्यासोबत असं काही केलं जे ऐकूनच तुम्ही हादराल.
फटाके देण्याचं आमिष दाखवत अवघ्या ८ वर्षांच्या मुलासोबत नको ते कृत्य करण्यात आलं आहे. एका नराधमाने त्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि तितकीच निंदनीय घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर घडलेला प्रकार कोणालाही सांगितलास तर जीवे मारेन अशी धमकी त्याने दिली. अखेर याप्रकरणी याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून 32 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर यापूर्वीही विनयभंग आणि अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
चिमुकला मित्रांसोबत फटाके फोडत होता, पण घाबरून घरी आला आणि…
दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी पीडित मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ फटाके फोडत होता. त्याचवेळी आरोपी तिथे आला आणि त्याने त्या चिमुकल्या मुलाला आणखी फटाके देण्याचे आमिष दाखवले. फटाक्यांचे नाव ऐकून त्याचे डोळे उत्साहाने लुकलुकले. त्यानंतर आरोपीने त्याला सोबत घेतले आणि तो जवळच्याच इमारतीत घेऊन गेला. तेथए नेऊन त्याने त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर घडलेल्या या प्रकाराबाबत कोणालाही सांगितलं किंवा जराही तोंड उघडलंस तर ठार मारेन अशी धमकीही त्या नराधमाने चिमुकल्या मुलाला दिली.
घाबरलेल्या अवस्थेतच तो पीडित मुलगा घरी आला आणि सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर बुधवारी अँटॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार, ठार मारण्याची धमकी व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग आणि अश्लील वर्तन केल्याबद्दल या आरोपीविरोधात अँटॉप हिल व माटुंगा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पीडिताचे कुटुंबिय आणि इतर नागिकांकडून करण्यात येत आहे.