Aarey Colony Leopard : आरे कॉलनीत दीड वर्षांच्या मुलीचा जीव घेणारा हाच तो बिबट्या? अखेर जेरबंद!

| Updated on: Oct 26, 2022 | 2:35 PM

बुधवारी सकाळी मुंबईच्या आरे कॉलनीत बिबट्याला जेरबंद करण्यात यश! पण हल्ला करणारा हाच होता?

Aarey Colony Leopard : आरे कॉलनीत दीड वर्षांच्या मुलीचा जीव घेणारा हाच तो बिबट्या? अखेर जेरबंद!
अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : बुधवारी सकाळी आरे कॉलनीतील बिबट्याला (Aarey Colony Leopard) जेरबंद करण्यात यश आलं. युनिट नंबर 15 इथं वन विभागाने बिबट्याला (Leopard) पकडण्यासाठी एक पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. त्यामुळे आरे कॉलनीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आरे कॉलनीच्या युनिक क्रमांक 16 इथं असलेल्या न्यूझीलंड हॉस्टेल (New Zeeland Hostel in Aarey Colony) जवळ हा ट्रॅप लावण्यात होता. ज्यात बिबट्या अडकला.

जेरबंद झालेला बिबट्या नर असून तो तीन वर्षांचा असल्याची माहित समोर आली आहे. वन विभागाचे अधिकारी जी मल्लिकार्जुन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या सुखरुप आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. जिथे ही घटना घडली होती, तेथील जवळच्याच भागात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

सोमवारी पहाटे एक दीड वर्षांची मुलगी घराबाहेर आईच्या मागे आली होती. त्यावेळी बिबट्याने आपल्या जबड्यात या मुलीला पकडून जंगलात पळ काढला होता. तब्बल तासाभराच्या शोधानंतर जंगलात ही चिमुरडी जखमी अवस्थेत आढळून आली होती.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान या दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यानंतर 48 तासांच्या आतच बिबट्याला पकडण्यात यश आलं असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आता पकडण्यात आलेला बिबट्या हा सी-55 असल्याचंही वनविभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. एकूण तीन बछडे असून त्यातील दोन नर आहेत एक मादी बिबट्याही असल्याची माहिती त्यांनी दिली. आता सी-55ला जेरबंद करण्यात आलं आहे. मात्र जर हल्ले आणखी वाढले, तर येत्या काळात सी-56 लाही पकडण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यामुळे आरे कॉलनीतील नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे. आरेमध्ये याच महिन्याच्या सुरुवातीलाही एका 9 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. पण या हल्ल्यातून मुलगा थोडक्यात बचावला होता. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे आरे कॉलनीत दहशत पसरली होती.