Special story : दिशा सालियन 14 व्या मजल्यावरून कशी पडली? 8 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची 6 वर्षांनंतर CBI चौकशी सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर हा निर्णय दिला. 8 जून 2020 रोजी मालाड येथील 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. आता CBI ही आत्महत्या होती की हत्या, याचा तपास करून सत्य समोर आणणार आहे.

Disha Salian Death News : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तब्बल 6 वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला. त्यामुळे आता दिशाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास सीबीआय करणार असून या प्रकरणाचं सत्य उजेडात येणार आहे. या निमित्ताने नेमकं हे प्रकरण काय आहे? याचा घेतलेला हा विस्तृत आढावा.
दिशा सालियनचा मृत्यू 6 वर्षापूर्वी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, 8 जून 2020 रोजी रात्री ही घटना घडली. मुंबईच्या मालाड येथील एका उंच इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून दिशा पडली आणि तिचा मृत्यू झाला, असं पोलिसांच्या चौकशीत आणि दिशाच्या मित्रांच्या साक्षीच्या आधारे समोर आलं. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असावी असं म्हटलं होतं. पण दिशाच्या कुटुंबाने यामागे काही काळंबेरं असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दिशाच्या कुटुंबीयांनी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.
त्या रात्री काय घडलं?
पोलिसांच्या चौकशीनुसार, ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री दिशा सालियन मालाडच्या तिच्या एका फ्लॅटमध्ये होती. तिथे पार्टी सुरू होती. मद्यसेवनही सुरू होतं. दिशासोबत तिचे मित्रही होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी दिशाने खूप मद्य घेतलं होतं. ती तणावात होती. तिने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं होतं.
दिशाच्या मित्रांच्या मते, आता कुणाला माझी काळजी नाही, असं कथितपणे बोलून दिशा तणावातच रुममध्ये गोली होती. तिने दरवाजा बंद केला होता. रुममधून नळ सुरू असल्याचा आवाज येत होता. मित्रांना वाटलं ती उलटी करत असावी. पण बराच वेळ आवाज देऊनही तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सर्वांनाच्या मनात पाल चुकचुकली. त्यामुळे मित्रांनी जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा ती बाल्कनीतून खाली पडलेली होती.
वडिलांचा विश्वास नाही
पोलिसांच्या या थिअरीवर दिशाचे वडील सतीश सालियन यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी या सर्व प्रकारावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच या मागे काही काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. मुलीच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करावा आणि हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात यावं, असं त्यांचं म्हणणं होतं. दिशाचा मृत्यू सामान्यरित्या झाला नाही. याप्रकरणाची जी आधी चौकशी झाली त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, असं दिशाच्या वडिलांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून कोर्टासमोर या गोष्टी मांडल्या. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले.
सहा दिवसानंतर सुशांतही…
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 दिवसानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही संदिग्धरित्या मृत्यू झाला. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू आत्महत्या असल्याचं मानलं गेलं. मात्र, सुशांतच्या मृत्यूवर त्याची बहीण आणि भाऊ आजही संशय व्यक्त करत आहेत.
सीबीआय काय करणार?
या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर वकील नीलेश ओझा यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली होती. कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणात एफआयआर दाखल करणार. आणि चौकशी सुरू करेल. त्यासाठी सीनिअर अधिकारी नियुक्त केला जाईल. दिशाच्या वडिलांची साक्षही नोंदवली जाणार आहे. त्याशिवाय या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड सीबीआयला दिले जाईल. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास करावा म्हणून या गोष्टी केल्या जातील, असं नीलेश ओझा यांनी सांगितलं.
या प्रकरणात ज्याच्या विरोधात पुरावे मिळतील, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पुराव्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आरोपी बनवू नये, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. जर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला तर आम्हाला आक्षेप घेण्याचा आणि प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार असेल. सत्याचा विजय होईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असं ओझा म्हणाले.
दिशाचे वडील काय म्हणाले?
दिशाचे वडील सतीश सालियन यांनीही मीडियाशी संवाद साधला. या निर्णयाची मी सहा वर्षापासून वाट पाहत होतो. मी माझी मुलगी गमावलीय. आता सीबीआय या प्रकरणाचा सखोल तपास करेल याची मला खात्री आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मिळाल्यावर मी न्यायाधीशांचे आभार मानले आहेत, असं सतीश सालियन म्हणाले.
सेलिब्रिटी मॅनेजर
दरम्यान, दिशाचा मृत्यू झाला तेव्हा ती 28 वर्षाची होती. सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून ती काम करत होती. काही काळ तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसातच म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांतचाही मृत्यू झाला. दोन्ही घटनांमध्ये काही दिवसांचंच अंतर असल्याने यावर अनेक सवाल केले गेले.
पोलीस आधी काय म्हणाले?
दरम्यान, दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सुरुवातीला ही एक आत्महत्या होती असं म्हटलं. कोणतंही षडयंत्र किंवा लैंगिक शोषण झालं नसल्याचं आमच्या तपासात आढळून आल्याचं पोलिसांनी आधी सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. पण या तपासावर दिशाचे वडील समाधानी नव्हते. त्यांनी या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतील त्रुटींवर बोट ठेवले होते. काही प्रभावशाली लोकांना वाचवलं जात असून या प्रकरणात दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.