‘त्याने’ लोकांसमोर शेजारच्यांना संपवलं, मुंबईला हादरवणारी घटना, भर दिवसा धक्कादायक प्रकार

| Updated on: Mar 24, 2023 | 9:50 PM

आरोपीने असा संतापजनक प्रकार का केला असावा? असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित करण्यात येत होता. पोलिसांनी संबंधित प्रकरणी तपास केला असता या हल्ल्यामागील नेमकं कारण समोर आलं आहे.

त्याने लोकांसमोर शेजारच्यांना संपवलं, मुंबईला हादरवणारी घटना, भर दिवसा धक्कादायक प्रकार
Follow us on

मुंबई : ‘शेजारी-शेजारी पक्के शेजारी’, अशी एक म्हण आहे. या म्हणीनुसार अनेकांचे शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत नेहमी चांगले संबंध असतात. शेजारी राहत असले तरी अगदी एकाच कुटुंबातले असल्यासारखे अनेकजण वागतात. एकमेकांच्या संकटात धावून जातात. तसेच सुखाच्या क्षणात सहभागी होतात. त्यामुळे अनेकांकडून शेजार धर्म पाळला जातो, असं म्हटलं जातं. पण मुंबईत एका ठिकाणी एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका इसमाने घराशेजारी राहणाऱ्या पाच जणांवर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईच्या डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका इसमाने शेजारी राहणाऱ्या तब्बल 5 जणांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झालाय तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये दोन वृद्ध पती-पत्नीचा समावेश आहे. तसेच हल्ला करणाऱ्या एकूण पाच जणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपीने हल्ला का केला?

आरोपीने हा हल्ला नेमका का केला असावा? असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित करण्यात येत होता. पोलिसांनी संबंधित प्रकरणी तपास केला असता या हल्ल्यामागील नेमकं कारण समोर आलं आहे. स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावातून आणि रागाच्या भरात हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. शेजारच्या घरात राहणाऱ्या पाच जणांमुळेच आपले कुटुंबिय सोडून गेले या विचारातून आरोपीने संबंधित कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित प्रकार समोर आला तेव्हा एकच खळबळ उडाली. घटनेनंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री अशी दोन्ही मृत पती-पत्नीची नावे आहेत. तर उर्वरित तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेतली आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तसेच डी बी मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलीय. पोलिसांना तपासातून या प्रकरणी आणखी काही नवी माहिती मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.