Video : कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढणाऱ्या दोघा तरुणांना अखेर अटक! पाहा त्यांचं संतापजनक कृत्य

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खार येथे कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली होती संतापजनक घटना

Video : कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढणाऱ्या दोघा तरुणांना अखेर अटक! पाहा त्यांचं संतापजनक कृत्य
अखेर दोघांनाही अटक
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 01, 2022 | 6:10 PM

मुंबई : पश्चिम उपनगरातील खार इथं एका कोरियन युट्युबर तरुणीची दोघा तरुणांनी छेड काढली होती. या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केलीय. 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपी तरुणांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघा तरुणांची नावं मोबिन शेख (19) आणि मोहम्मद अन्सारी (21) अशी आहेत. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येईल. खार पोलिसांनी या तरुणांवर अटकेची कारवाई केली आहे.

संतापजनक कृत्य

29 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी एका तरुणीची दोघा तरुणांनी छेड काढली होती. खार येथील सद्गुरु हॉटेलच्या लेनवर दोन मुलांनी केलेला प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला होता. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर कलम 354, 354 ड, आणि 34 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांना युट्युबर महिलेनची छेड काढणारे तरुणी वांद्रे पश्चिम भागातील पटेल नगर इथं राहणारे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने पटेलनगर इथं आरोपी मोबिन चांद मोहम्मद शेख, वय 19 आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सारी, वय 21 यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतःहून शासनाच्या वतीने फिर्याद दाखल करुन घेतली. त्यानंतर कसून तपास करत 12 तासांच्या आत आरोपींना अटकही केली आहे. याप्रकरणी आता पुढील कारवाई केली जाते आहे. पोलीस निरीक्षक मोहन माने आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नडविणकेरी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केलीय.

काय केलं होतं? पाहा व्हिडीओ

कोरियन युट्युब तरुणीसोबत या दोघा आरोपींनी व्हिडीओ काढताना गैरप्रकार केला होता. तिला दुचाकीवर बसण्यासाठी बळजबरी करणं, या तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिचा हात पकडणं, तिच्याशी जवळीक साधणं, असा प्रकार या दोघा तरुणांनी केली होता. या घटनेमुळे कोरियन तरुणी प्रचंड घाबरली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.