Sameer Wankhede : समीर वानखेडेंकडून नवाब मलिक यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार; दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याचा आरोप

| Updated on: Aug 15, 2022 | 1:16 AM

वानखेडे यांच्या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे सध्या तुरुंगात असलेले नवाब मलिक यांच्या अडचणीत मोठी भर पडली जाण्याची शक्यता आहे.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंकडून नवाब मलिक यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार; दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याचा आरोप
समीर वानखेडेंकडून नवाब मलिक यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : जात प्रमाणपत्र प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर त्यांनी आता महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरूद्ध कायदेशीर लढाई सुरु केली आहे. वानखेडे यांनी रविवारी दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार (Complain) दाखल केली आहे. वानखेडे यांच्या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे सध्या तुरुंगात असलेले नवाब मलिक यांच्या अडचणीत मोठी भर पडली जाण्याची शक्यता आहे.

जात प्रमाणपत्र छाननी समितीच्या निर्णयानंतर मलिक यांना दुहेरी झटका

समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र छाननी समितीने वानखेडे यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. त्यांच्याविरोधात सर्व आरोप खोटे असल्याचे जात प्रमाणपत्र छाननी समितीने म्हटले आहे. समितीच्या या निर्णयाने नवाब मलिक यांना मोठा झटका दिला आहे. याचदरम्यान वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्या संकटात मोठी भर टाकली आहे. ही पोलीस तक्रार मलिक यांच्यासाठी दुहेरी झटका मानली जात आहे.

कुटुंबाचा मानसिक छळ झाल्याबद्दल पोलिसांत तक्रार

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, वानखेडे हे जन्माने मुस्लिम नव्हते. ते महार जातीचे असून अनुसूचित जातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर वानखेडे यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. त्यादरम्यान कुटुंबियांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे वानखेडे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले. माझ्या कुटुंबाचा झालेला मानसिक छळ तसेच आमच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत मी पोलिस तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच रागातून मलिक यांनी निरर्थक आरोप करीत मला व माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला आहे. मलिक यांनी भाषणे आणि पत्रकार परिषदांमध्ये वानखेडे यांच्या जातीबद्दल वारंवार विधाने केली. मीडियामध्ये सतत चिखलफेक केल्यामुळे वानखेडे यांचे कुटुंब निराशेच्या गर्तेत गेले, असे वानखेडे यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. (Police complaint against Nawab Malik by Sameer Wankhede)