एकाच घरातील ज्या 3 भावंडांच्या अपहरणाने खळबळ, ती तिघंही सापडली! 5 दिवस होती कुठे?

5 दिवस तिन्ही भावंडं घरी आली नाहीत! ती कुठे राहिली? त्यांनी कसे दिवस काढले? काय खाल्लं? अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत.

एकाच घरातील ज्या 3 भावंडांच्या अपहरणाने खळबळ, ती तिघंही सापडली! 5 दिवस होती कुठे?
अखेर तिन्ही भावंडं सुखरुप घरी परतली
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 27, 2022 | 1:52 PM

अविनाश माने, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, ठाणे : मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा अफवा गेल्या काही दिवसांत पसरल्या होत्या. या अफवांचं प्रकरण ताजं असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. मुंब्रामध्ये (Mumbai Kids Missing) एकाच कुटुंबातील (Family) तीन मुलं अचानक गायब झाली होतील. घरातून शाळेला जायला निघालेली ही मुलं बेपत्ता झाल्यानं कुटुंबीय देखील हवालदिल झाले होते. मात्र अखेर 5 दिवसांनंतर ही तिन्ही मुलं सापडली (Siblings Found) आहेत. त्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळालाय. नेमकी ही मुलं गेली कुठं होती आणि इतके दिवस होती कुठे, याचा आता तपास केला जातोय.

शाळेत गेले, ते परतलेच नाही!

मुंब्रा कौसा येथून अली कुटुंबातील तीन भावंडं एकाच दिवशी गायब झाली. नाजीया अली (14), नाजीम अली (12) आणि शोएब अली (11) अशी या तिघा बेपत्ता झालेल्या मुलांची नावं होती. घरातून ते शाळेत जायला निघाले होते. पण नंतर परत घरी परतलेच नव्हते. या तिन्ही मुलांचं अपहरण झाल्याची शंका घेण्यात आली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

कुठे साडपली?

अखेर नाजीया, नाजीम आणि शोएब ही तिन्ही भावंडं कुर्ला लोहमार्ह पोलिसांना आढळून आली. कुर्ला रेल्वे स्थानकातून त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं. अखेर मुंब्रा पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. त्यानंतर त्यांना मुंब्रा पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. 22 तारखेला बेपत्ता झालेली मुलं इतकी दिवस होती कुठे, याचं गूढ उकलण्याचं काम आता पोलिसांकडून सुरु आहे.

कुर्ला लोहमार्ग पोलिसांना कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाटावर ही तीन मुले आढळली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या मुलांनी आपण घरातून पळून आल्याची माहिती दिली. कुर्ला पोलिसांनी तत्काळ मुंब्रा पोलोसांशी संपर्क साधला आणि या मुलांना कुटुंबाच्या हवाले केले. पाच दिवस ही मुलं बेपत्ता झाल्यामुळे या मुलांच्या आईचा जीव कासावीस झाला होता. पण तरिही पोलिस तक्रार का केली नाही, असा सवालही पोलिसांनी महिलेला केलाय.

दरम्यान, ही मुले घरातून का पळून गेली होती याचे कारण समोर आलेले नाही. मुंब्रा पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहेत. आपल्या मुलांना शोधून काढल्याने या मुलांच्या आई नजमा बानो यांनी पोलिसांचे आभार मानले आहे. कोवळ्या वयातील तीनही भावंडं एकाचवेळी घर सोडून का गेले, याचा उलगडण्याचा करण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून गेला जातोय.