ओळखीचा होता, पैसे बघून नजर फिरली, दरोड्यासाठी ज्वेलर्स मालकाची हत्या करुन खाडीत फेकलं, हत्येचं गूढ अखेर समोर

| Updated on: Aug 26, 2021 | 4:58 PM

ठाण्यात व्यापारी मनसुख हिरेन यांच्यानंतर पुन्हा एका व्यापाऱ्याच्या हत्येची घटना समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील सूत्रधारांना नौपाडा पोलिसांना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

ओळखीचा होता, पैसे बघून नजर फिरली, दरोड्यासाठी ज्वेलर्स मालकाची हत्या करुन खाडीत फेकलं, हत्येचं गूढ अखेर समोर
मनसुख हिरेन यांच्यानंतर ठाण्यातील आणखी एका व्यावसायिकाची हत्या
Follow us on

ठाणे : ठाण्यात व्यापारी मनसुख हिरेन यांच्यानंतर पुन्हा एका व्यापाऱ्याच्या हत्येची घटना समोर आली आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या उद्देशानेच ठाण्यातील बी. के. ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या हत्या प्रकरणातील सूत्रधारांना नौपाडा पोलिसांना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

यापैकी एक आरोपी जैन यांच्या परिचयाचा होता. त्यामुळे जैन यांना जिवंत सोडले तर आपले बिंग फुटेल, या भीतीपोटी हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे. ठाण्यातील ज्वेलर्स भरत जैन यांचा मृतदेह 20 ऑगस्टला मुंब्रा कळवा, रेतीबंदर येथील खाडीत आढळला होता.

पोलिसांनी आरोपींना बेड्या कशा ठोकल्या?

भारत जैन हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले होते. त्याआधारे तपास करत जैन यांना घेऊन जाणार्‍या ओला कारचा चालक आणि त्याच्या सहकार्‍याला पोलिसांनी अटक केली होती. जैन यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हातपाय बांधून खाडीत टाकल्याची तसेच दुकानातील दीड लाख रुपयांचे चांदिचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली होती. पण या हत्येचे दोन्ही मुख्य सूत्रधार पसार झाले होते.

नौपाडा पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करुन या दोघांच्या हाती बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी एक जण कळवा तर दूसरा खोपट परिसरात राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी एक आरोपी हा जैन यांच्या परिचयातला होता.

चोरांनी नेमकी काय कबुली दिली?

या दुकानात असलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची आम्हाला माहिती होती. तिथे चोरी करणे हाच आमचा उद्देश होता. पण 25 लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो सोने असलेली तिजोरी आम्हाला उघडता आली नाही. त्यामुळे आमच्या हाती दीड किलो चांदीच लागली. जैन यांना जिवंत सोडले असते तर त्यांनी पोलिसांकडे आमची माहिती दिली असती आणि आम्हाला लगेच अटक झाली असती. ती होऊ नये यासाठी जैन यांना ठार मारल्याची कबुली या आरोपींना दिली आहे.

हेही वाचा :

मनसुख हिरेन यांच्यानंतर ठाण्यातील आणखी एका व्यावसायिकाची हत्या, दोघांना बेड्या, पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?