
मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सूप प्यायल्याने दोन बहिणींचा लागोपाठ मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र आता त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून त्यांच्या घरातील व्यक्तीनेच जाणीवपूर्वक सूपमध्ये विष (poision) मिसळून त्यांना प्यायल्या दिल्याचं उघड झालं. मात्र हे कृत्य (murder) करणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर येताच सगळे हादरले.
त्या दोन बहिणींची हत्या दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नव्हे तर त्यांच्याच भावाने केल्याचे समोर आले आहे. ‘दृश्यम’ चित्रपट पाहून त्या इसमाला बहिणींना संपवण्याची आयडिया मिळाली असे पोलिसांनी सांगितले. त्याने त्याच्याविरोधात सर्व पुरावे नष्ट केले. अतिशय फूलप्रूफ प्लानिंग करून त्याने दोघींच्या हत्येचा कट रचला.
रिपोर्टनुसार, आरोपीचे नाव गणेश मोहिते असे आहे. वडिलांच्या निधनानंतर तो त्यांच्या जागेवर पालघर वन विभागात क्लार्कच्या पदावर काम करू लागला. त्याच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले नव्हते आणि त्यांच्यामध्ये संपत्तीवरून वादही सुरू होता, यामुळे गणेश वैतागला होता. यामुळेच त्याने त्यांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. ‘दृश्यम’ चित्रपट पाहून, त्यावरून आयडिया घेत त्याने बहिणींना संपवण्याचा कट आखला. एवढेच नव्हे तर त्याने या मर्डर केसमध्ये त्याच्या एका नातेवाईकालाही फसवलं. पोलिस आणि त्याच्या आईच्या नजरेत त्याने त्या नातेवाईकाला दोषी बनवलं. त्यानेच सूपमधून विष देऊन बहिणींना संपवलं, असा आरोप गणेशने केला. पण एवढं करूनही अखेर तो फसलाच आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
बहिणींना कसं संपवलं ?
रिपोर्ट्सनुसार, १५ ऑक्टोबर रोजी गणेश हा त्याच्या कुटुंबियांना नवरात्रीच्या एका कार्यक्रमासाठी घेऊन गेला. पालघरमध्येच बहिणींना संपवलं तर त्याच्यावर संशय येईल, हे त्याला माहीत होतं. म्हणूनच त्याने रेवदंडा येथे जाऊन त्यांची हत्या केल्यावर त्याचा आळ दुसऱ्या नातेवाईकावर लावला. गणेशने त्याच्या बहिणींसाठी सूप तयार करून त्यात विष मिसळून त्यांना ते प्यायला दिलं. त्याचवेळी त्याने आईला पाणी आणण्यासाठी आत पाठवलं. त्यानंतर तो नवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाहेर गेला.
थोड्यावेळाने त्याला बहिणींचा फोन आला, आपल्याला बरं वाटतं नसल्याचं त्यांनी गणेशला सांगितलं. मात्र नवरात्रीसाठी बाहेर असल्याचा बहाणा करत तो घरी खूप उशीरा परतला. त्यानंतर त्याने दोघींनाही सिव्हिल रुग्णालयात नेलं. पण १७ ऑक्टोबर रोजी त्याच्या एका बहिणीचा मृत्यू झाला. तर दुसरी बहीण स्नेहा हिची प्रकृती आणखी खाालवल्याने तिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात रेफर करण्यात आलं. २० ऑक्टोबर रोजी तिचाही मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर आभाळच कोसळलं. ज्या नातेवाईकांशी संपत्तीवरून वाद झाला होता, त्यानेच दोघी बहिणींना पाण्यातून विष दिलं असावं असा आरोप करत गणेशने त्याच्या आईच्या मनात ही गोष्ट भरवली.
असा झाला खुनाचा उलगडा
त्या दोघींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्या नातेवाईकाची चौकशी केली असता, त्याने आपण असं काहीच केलं नसल्याचं स्पष्ट केलं. आपण घराबाहेर सीसीटीव्हीदेखील लावल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी त्याचे फुटेज चेक केल्यावर पाण्यात काहीही मिसळलं नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानी गणेशचा फोन तपासला. तेव्हा गणेशने नेटवर विषाबद्दल ५३ वेळा सर्च केल्याचं पोलिसांना समजलं. विष, गोड विष, कमी गंध वालं विष आणि विष खाल्ल्यावर किती वेळाने मृत्यू होतो, याबद्दल सर्च केल्याचं पोलिसांना आढळलं.
हत्येमागचं कारण ?
रिपोर्ट्सनुसार, गणेशचे वडील वनविभागात अधिकारी होते. अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या जागी काम करण्यावरून कुटुंबात वाद झाला होता. त्याच्या बहिणींमुळे आरोपी गणेश वैतागला होता, त्याचा सर्व पगार त्याला त्यांच्यावर खर्च करावा लागत होता. वडिलांच्या संपत्तीवरही त्या दावा करतील, अशी त्याला भीती होती. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.