नवरा असला म्हणून काय झालं? सावध राहा… पोलिसांचं आवाहन; असं काय केलं नवऱ्याने?

गोंदियात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्यानेच पत्नीचा विश्वासघात केल्याची ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

नवरा असला म्हणून काय झालं? सावध राहा... पोलिसांचं आवाहन; असं काय केलं नवऱ्याने?
Gondia news
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2023 | 9:46 AM

गोंदिया : हल्ली गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ओळखीच्या आणि नात्यातील लोकांकडूनच अधिक विश्वासघात केला जात आहे. त्यातच आता सोशल मीडियामुळे या गुन्ह्याची व्याप्ती अधिकच वाढली आहे. सोशल मीडियामुळे झटक्यात बदनामी होते. त्यामुळे अनेकांना तोंड दाखवणंही मुश्किल होतं. गोंदियातही एका महिलेच्याबाबतीत धक्कादायक घटना घडली आहे. तिच्या नवऱ्यानेच तिचा विश्वासघात केल्याने तिला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच कुणी का असेना सावध राहा, असं आवाहन गोंदिया पोलिसांनी केलं आहे.

रवींद्र आणि रविना (दोन्ही बदललेले नाव आहेत) या दोघांचेही चार महिन्यांपूर्वी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात धुमधडाक्यात लग्न झाले होते. फेब्रुवारीत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर दोघांनीही संसाराला सुरुवात केली. चांगला नवरा मिळाला म्हणून रविना खूश होती. पतीवर विश्वास टाकून होती. मात्र, नवऱ्याच्या डोक्यात काय शिजतंय हे तिला काय माहीत? लग्नानंतर नवऱ्याने तिच्यासोबतचे अनेक क्षण कॅमेऱ्यात टिपले. विवाह प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओही काढले. त्यानंतर त्याने पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडीओही काढले. रवींद्रने हे फोटो आणि व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले.

अन् तिच्या पाखाखालची वाळूच सरकली

सुखी संसार सुरू असतानाच काही महिन्याने रवींद्र आणि रविना यांच्यात घरगुती कारणावरून खटके उडू लागले. अगदी क्षुल्लक कारणावरूनही दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे दोघांचेही पटेनासे झाले. रोजच्या कटकटीला वैतागून अखेर रविना आपल्या माहेरी गेली आणि तिथेच राहू लागली. नवरा सुधारल्यानंतरच माहेरी जायचं असंही तिने ठरवलं. पण नवरा सुधारण्याआधीच तिच्या पुढ्यात जे आलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

23 आणि 24 जून रोजी रविनाच्या भावाच्या इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवर रवींद्र आणि रविनाचे खासगी फोटो आणि व्हिडीओ आले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने रविनाच्या भावाला धक्काच बसला. त्याने घरच्यांना हा प्रकार सांगितला. रविनालाही हा प्रकार सांगण्यात आला. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खासगी व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक केल्यामुळे तिने सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घडला प्रकार सांगितला.

पत्नीची पोलिसात धाव

सोशल मीडियावरून नवऱ्यानेच आपली बदनामी केल्याची तक्रार तिने पोलिसात दिली. भावाच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून नवऱ्याने ही करामत केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 354, 500, 509 , 67 अ अन्वये गुन्हाची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला पीसीआर मिळाला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत, असं पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितलं.

सावध राहा, पोलिसांचं आवाहन

तरुण, तरुणांनी अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ काढू नये. नवदाम्पत्यांनीही अशा प्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो काढू नये. नाही तर भविष्यात बदनामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. कुणावरही आंधळेपणाने विश्वास टाकू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.