Washim Accident : भीषण अपघातानंतर ट्रक थेट कारवर पलटी! कारमधील कुटुंबाचं काय?

| Updated on: Nov 11, 2022 | 8:50 AM

वाशिममधील अपघात वाढले! नागपूर मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रक अपघाताचा थरार

Washim Accident : भीषण अपघातानंतर ट्रक थेट कारवर पलटी! कारमधील कुटुंबाचं काय?
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वाशिम : राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न वारंवर अधोरेखित होतोय. पण अपघातांचं प्रमाण काही कमी होत नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. नागपूर मुंबई एक्स्प्रेस (Nagpur Mumbai Express Highway Accident) हायवेवर दोन ट्रकचा भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातानंतर एक ट्रक (Washim Accident) थेट कारवर कोसळला. या कारचं अक्षरशः चुराडा झाला. धक्कादायक बाब म्हणजे या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होतं. पण हे कुटुंब अगदी थोडक्यात वाचलंय. कारमधील कुटुंबाने मृत्यूला हुलकावणी दिली असली, तरी अपघातानंतर केबिनमध्ये अडकला गेल्यानं एका ट्रक चालकाला जीव गमवावा लागलाय.

नागपूर मुंबई द्रुतगती महामार्गावर कामरगाव येथील अंकुश धाबाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. दोन ट्रक एकमेकांना धडकले. तर एक ट्रक थेट रस्त्यावरुन जात असलेल्या कारवरच पलटी झाला होता. याच कारचं मोठं नुकसान झालं. कार छत चेपलं गेल्यानं गाडीचं चक्काचूर झाला होता.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, एका ट्रकमधील चालक हा धडक बसल्यानंतर केबिनमध्ये अडकला गेला. वेळीच बाहेर पडून न शकल्यामुळे ट्रक चालकाला या अपघातात जीव गमावावा लागलाय. यात ट्रकच्या दर्शनी भागाला जबर फटका बसला होता.

स्विफ्ट डिझायर MH 04 DW 6580 क्रमांकांच्या कारवर ट्रक उलटला होता. पण या कारमधील प्रवासी दैव बलवत्तर म्हणून अगदी थोडक्यात मोठ्या अपघातातून बचावले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या मदतीने हटवण्यात आली. ट्रक पलटी होऊन चुराडा झालेली कार क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

नागपूर मुंबई महामार्गावर अपघात वाढले असल्याचं चिंता व्यक्त केली जातेय. काल दोन अपघात या भागात झाले होते. त्यामुळे आता पोलिसांनी चेकपोस्ट लावून वेग वाहनचालकांची वेग मर्यादा तपासावी, अशी मागणी केली जातेय.