राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

| Updated on: Dec 26, 2021 | 9:58 AM

बैलगाडा स्पर्धेतील 21 हजार रुपयांचे पहिले बक्षीस नारायणटेंभी गावातल्या शंभू नावाच्या बैलाला मिळाले. 11 हजारांची तीन बक्षीसे अनुक्रमे दोन आडगाव येथील बैलांना, तर एक नारायणटेंभी येथील बैलाला मिळाले.

राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल
नाशिकमधल्या ओझर येथील बैलगाडा शर्यतीला सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम उपस्थित होते.
Follow us on

नाशिकः कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे एकीकडे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. त्यांनी राज्यात तातडीने कोरोना प्रतिबंधाचे निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले. मात्र, दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी ओझरमध्ये बैलगाडा शर्यतीच्या नावाखाली हजारो लोकांचा जमाव जमवून त्या निर्बंधाची अक्षरशः शकले उडवल्याचे समोर आले. अखेर याप्रकरणी आयोजक माजी आमदार अनिल कदमांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठल्यानंतर शनिवारी नाशिकमधल्या ओझरमध्ये राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत रंगली. मात्र, या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाची कसलिही परवानगी घेण्यात आली नव्हती. राज्य सरकारने राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. त्यानुसार कुठल्याही कार्यक्रमाला 250 लोकांपेक्षा जास्त जणांचा जमाव जमवू शकत नाही. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. मात्र, या स्पर्धेला आसनक्षमतेचा तर प्रश्नच नव्हता. हजारो नागरिकांचा जमाव यावेळी जमला होता. राज्यभरातील शेकडो स्पर्धक उपस्थित होते. त्यामुळे येथे अलोट गर्दी होती. मास्क आणि सुरक्षित अंतराबद्दल न बोललेच बरे.

यांच्यावर गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत अशी निर्बंधाची आणि नियमांची पायमल्ली करत पार पडली. याप्रकरणी राज्यातला पहिला गुन्हाही सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यावर दाखल झाला. त्यांच्यासह आशिष शिंदे, स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ, हर्षल चौधरी, महेश शेजवळ, पिंटू शिंदे, अनिल सोमासे, संजय भिकुले, अमोल भालेराव या कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पुढे काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे.

पहिले बक्षीस नारायणटेंभीला

बैलगाडा स्पर्धेतील 21 हजार रुपयांचे पहिले बक्षीस नारायणटेंभी गावातल्या शंभू नावाच्या बैलाला मिळाले. 11 हजारांची तीन बक्षीसे अनुक्रमे दोन आडगाव येथील बैलांना, तर एक नारायणटेंभी येथील बैलाला मिळाले. उंबरपाडा, आडगाव, पेठ, कोशिंबे, पाटपिंप्री, सिन्नर, बंदरे, आंबे, चितेगाव, मडकीजांब, खडकओझर, दिक्षी, बोपेगाव, सावरगाव, जोपुळ, खडकजांब या गावातील बैलजोड्यांनाही बक्षीसे देण्यात आली.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये प्रशासनाला डुलकी; जमावबंदीतला ‘ज’ सुद्धा पाहायला मिळेना, कोरोना नियमांच्या अमंलबजावणीचा विसर

Nashik NCP|आधी वाहनतळ, मगच टोइंग; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आंदोलनाचा इशारा

अंबड ट्रक टर्मिनलचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे ठाकरे, गडकरींना साकडे