कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा मर्डर, मृतदेह पेटवून दरीत फेकले; खुनानंतर आनंदोत्सव, नाशिकमध्ये क्रूरतेचा कळस

| Updated on: Feb 17, 2022 | 9:41 AM

हॉटेल व्यावसायिक राहुलने पिता-पुत्राचा थंड डोक्याने मर्डर केल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा केला. आपले मित्र आणि हॉटेलमधील 22 सहकाऱ्यांना रत्नागिरीला नेत तिथे जोरदार पार्टी केली. कोकणच्या पर्यटनाचा आनंद लुटला. चार दिवस मौजमजा करून ते पुन्हा नाशिकला परतले.

कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा मर्डर, मृतदेह पेटवून दरीत फेकले; खुनानंतर आनंदोत्सव, नाशिकमध्ये क्रूरतेचा कळस
डावीकडून नानासाहेब कापडणीस, अमित कापडणीस आणि आरोपी राहुल जगताप.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) एकामागून एक भयंकर अशी हत्याकांडे होताना दिसत आहेत. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय 70) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (वय 35) या दोघांचा अतिशय क्रूर खून (Murder) केल्याचे उघड झाल्याने शहर पुन्हा हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) मुख्य आरोपी राहुल गौतम जगताप (वय 36) याला बेड्या ठोकल्यात. राहुलने पिता-पुत्राची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पेटवून दिल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूनही काही दिवसांपू्र्वी अशाच प्रकारे झालाचे समोर आलेय. त्यांचे पती संदीपने त्यांचा अगोदर खून करून त्यांना जाळल्याचा पोलिसांना संशय आहे. या थरारक हत्याकांडानंतर त्याहूनही थरारक हत्याकांड उघड झाल्याने समृद्ध नाशिकची नेमकी कोणीकडे वाटचाल सुरूय, असा प्रश्न सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही.

कसा केला खून?

नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र अमित कापडणीस रहायचे. अमित यांनी एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केलेय. मात्र, ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली. त्यानंतर अमितला व्यसनाधीन केले. तर डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकून दिला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्याचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकून दिला.हे दोन्ही मृतदेह संबंधित भागातील पोलिसांना सापडले. मात्र, त्या दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात कुठेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास रखडला.

कशी फुटली वाचा?

कापडणीस यांच्या पत्नी आणि मुलगी या मुंबईत राहतात. त्यांची मुलगी शीतलने कापडणीस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल राहुल जगतापकडे आढळला. त्या वडील आणि भावाला भेटायला नाशिकमध्ये आल्या. मात्र, तुमच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे कापडणीस दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्याची थाप राहुलने मारली. त्यामुळे मुलगी शीतल पुन्हा मुंबईला गेली. त्यानंतरही वडिलांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्या नाशिकला आल्या. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांना राहुलवरच संशय आला. त्यांनी तपास केला असता खुनाला वाचा फुटली.

खुनानंतर रत्नागिरीत पार्टी

हॉटेल व्यावसायिक राहुलने पिता-पुत्राचा थंड डोक्याने मर्डर केल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा केला. आपले मित्र आणि हॉटेलमधील 22 सहकाऱ्यांना रत्नागिरीला नेत तिथे थर्टीफर्स्टची जोरदार पार्टी केली. कोकणच्या पर्यटनाचा आनंद लुटला. चार दिवस मौजमजा करून ते पुन्हा नाशिकला परतले. कापडणीस यांच्या कुटुंबापैकी दुसरे कोणीही नाशिकमध्ये नाही. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र कुठे गेले आहेत, हे कोणीही विचारले नाही. त्याने त्यांच्या मुलीलाही खोटे सांगून मुंबईला धाडले होते. त्यामुळे आता सारे काही निस्तारले आहे, अशा आविर्भावात राहुल रहात होता. मात्र, पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्याच.

का केला खून?

नाशिकमध्ये कापडणीस यांची प्रचंड संपत्ती आहे. पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच रहायचे. हे पाहून त्याने नियोजनपद्ध पद्धतीने त्यांचा खून करून संपत्ती हडपण्याचा डाव रचला. हत्याकांडानंतर राहुल जगतपाने त्यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकस पैसा काढला. हे सारे रेकॉर्डवर होते. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला बेड्या ठोकल्या.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!