नाशिक पोलिसांची अनोखी भेट; नागरिकांना आनंदाश्रू आवरेनात, चोरीस गेलेला साडेतीन कोटींचा ऐवज केला परत

| Updated on: Oct 13, 2021 | 2:55 PM

नाशिक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत एकावर एक आनंदाचे धक्के देणे सुरूच ठेवले आहे. त्यात आता चोरीस गेलेला तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत केला. त्यामुळे अनेकांना आपला ऐवज मिळाल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले.

नाशिक पोलिसांची अनोखी भेट; नागरिकांना आनंदाश्रू आवरेनात, चोरीस गेलेला साडेतीन कोटींचा ऐवज केला परत
नाशिक पोलिसांनी तब्बल साडेतीन कोटींचा चोरीस गेलेला ऐवज नागरिकांना परत केला.
Follow us on

नाशिकः नाशिक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत एकावर एक आनंदाचे धक्के देणे सुरूच ठेवले आहे. यात कारवाई करत दोन बनावट दारूचे कारखाने उद्धवस्त केले. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता चोरीस गेलेला तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत केला. त्यामुळे अनेकांना आपला ऐवज मिळाल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले.

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये अनेकांच्या वस्तू चोरीला गेल्या. त्यात कुणाचे मोबाइल, कुणाची दुचाकी तर कुणाचे सोन्याचे गंठण. ही यादी खूप लांबवता येऊ शकते. इतकी की, मारुतीच्या लांबणाऱ्या शेपटीप्रमाणे तिचा अंत होणार नाही. मात्र, या दरम्यान नाशिक पोलिसांनी एक सुखद धक्का शहरवासीयांना दिला आहे. चोरीच्या अनेक घटनांमध्ये विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अनेक चोरटे आणि गुन्हेगाऱ्यांना तुरुंगाच हवा खायला लावली. त्यांच्याकडून गोळा केलेला मुद्देमाल संबंधितांना एका कार्यक्रमाच्या माध्यमातून परत करण्यात आला. त्यात कुणाचे दागिने, मोबाइल, महत्त्वाच्या वस्तू, मोटारसायकल यांचा समावेश होता. आता आपली एखादी वस्तू चोरीस गेली म्हटले की, आपण तिचा विचार सोडून देतो. असेच अनेकांनी केले होते. त्यात सध्या महागाईने गाठलेला कळस. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या. या काळात बऱ्याच जणांना मोबाइल, चोरीला गेलेली मोटारसायकल आणि दागिने ते ही ऐन सुणासुदीच्या तोंडावर मिळाले. हे पाहता त्यांचे आनंदाश्रू अनावर झाले. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पोलीस आयुक्तांचे आभार मानले.

हा मुद्देमाल केला परत

पोलिसांनी परत केलेल्या मुद्देमालामध्ये 2976000 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 4050000 किमतीच्या मोटारसायकल, 302000 किमतीचे मोबाइल, 27582550 किमतीची रोख रोखक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण 35090650 किमतीचा मुद्देमाल नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासह पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त विजय खरात, परिमंडळ आयुक्त आणि इतर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, फिर्यादींची उपस्थिती होती.