क्राईम पेट्रोल पाहून मुलीने केली आईची हत्या, लालबागमधील हत्याकांड प्रकरणी पोलिसांचा दावा

| Updated on: Mar 18, 2023 | 11:56 AM

मुंबईतील लालबागमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मुलीनेच आपल्या आईची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन घरामध्ये लपवला होता. या हत्याकांडात आता नवा खुलासा झाला आहे.

क्राईम पेट्रोल पाहून मुलीने केली आईची हत्या, लालबागमधील हत्याकांड प्रकरणी पोलिसांचा दावा
लालबाग हत्याकांड प्रकरणी पोलिसांचा खुलासा
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लालबागमध्ये घडलेल्या वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वीणा जैन या महिलेची हत्या तिच्या मुलीने टीव्हीवरील क्राइम पेट्रोल पाहून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिंपल हिला हत्या करण्यासाठी इमारतीतील इतर कोणी मदत केली का याचाही तपास पोलीस करत आहे. रिंपल ही नियमितपणे क्राइम पेट्रोलचा एपिसोड पाहत असे. क्राइम पेट्रोल पाहूनच तिने हत्येचा कट रचल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आईची हत्या केल्यानंतर तिचे तुकडे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचाही प्लान क्राइम पेट्रोल पाहून केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. वीणा जैन यांच्या मृत्यूमागील कारण अजूनही अस्पष्ट असून पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

मृतदेहाचे तुकडे घरामध्येच लपवले!

वीणा जैन यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे घरामध्ये लपवले होते. पोलिसांना हत्येच्या घटनेचा सुगावा लागू नये म्हणून रिंपलने क्राईम पेट्रोल पाहून अशा प्रकारे प्लान तयार केला होता. मात्र रिंपलने हत्येचा आरोप धुडकावून लावला आहे. आईचा खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.

मात्र तिच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. घरामध्ये मार्बल कटिंग करण्याची मशीन देखील पोलिसांना सापडली आहे. रिंपलने ही मशीन आईच्या मृतदेहाची तुकडे करण्यासाठी आणली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी सहा जणांचे नोंदवले जबाब

वीणा जैन यांच्या मृत्यूचा उलगडा झाल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. वीणा जैन यांचा मृत्यू 27 डिसेंबरला झाला होता. त्याच दिवशी त्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खाली पडल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरी आणण्यात आले होते, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. इमारतीच्या आवारातील दुकानदार, सेल्समन तसेच इब्राहिम कसिम बिल्डिंगच्या तळाला असलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीमध्ये नवनवे धक्कादायक खुलासे पुढे येऊ लागले आहेत. रिंपलने 27 डिसेंबरला फिनाईल तसेच रूम फ्रेशनरची खरेदी केली होती. यावरून तिचा आईला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे उघडकीस आले आहे.