नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले, तिघांवर प्राणघातक हल्ला

| Updated on: Mar 06, 2023 | 9:29 AM

नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून तिघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. याप्रकरणी तिघांवर लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले, तिघांवर प्राणघातक हल्ला
पैशाच्या वादातून तिघांवर प्राणघातक हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

भंडारा / तेजस मोहतुरे : नोकरीला लावण्यासाठी दिलेले 5 लाख रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या इमसासह त्याच्या पत्नी आणि मेव्हण्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. तिघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. हल्ल्यात तीन जण जखमी असून, त्यांच्यावर लाखनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शामकुंवर आणि नितीन मेश्राम अशी जखमींपैकी दोघांची नावे आहेत. आरोपी नरेश येडेकरसह त्याचा मुलगा आणि लहान भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिपिकाची नोकरी लावण्यासाठी 12 लाख मागितले

आरोपी नरेश येडेकर यांची आतेगाव येथे स्वतःची संस्था आहे. जखमी नितीन शामकुंवर यांच्याकडून त्यांचा मेव्हणा नितीन मेश्राम यास लिपिकाची नोकरी लावण्यासाठी 2011-12 मध्ये येडेकर याने 12 लाखांची मागणी केली. फिर्यादीने स्वतःची शेती विकून पाच लाख रुपये दिले. तर उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर देणार होते. रक्कम दिल्यावर फिर्यादी आणि आरोपीने नोटरी केली होती.

पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण

आरोपी नरेशने जखमी नितीन शामकुंवर, त्याचा मेव्हणा नितीन मेश्राम आणि त्याची बहीण अशा तिघांनाही फोन करून पैसे परत नेण्यासाठी बोलावले होते. घरी गेल्यानंतर पैसे मागण्यासाठी कशाला आले म्हणत नरेशचा मुलगा रुपेश येडेकर आणि लहान भाऊ ओम येडेकर या दोघांनी तिघांनाही मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

लाखनी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

पीडित कसेबसे जखमी अवस्थेत लाखनी पोलीस स्टेशनला पोहचले आणि पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनेची नोंद घेत तिघांवर गुन्हा दाखल केला. तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. लाखनी पोलीस पुढील तपास करत आहेत.