अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Nov 14, 2022 | 7:44 PM

पोलिसांनी फडके यांच्यासह एकूण 32 जणांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तर रात्री उशिरा पंढरीनाथ फडके, एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके या तिघांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली होती.

अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी
अंबरनाथ गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडके यांना पोलीस कोठडी
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रविवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना उल्हासनगर न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके यांनाही न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहुल पाटील यांच्यावर झाला होता गोळीबार

अंबरनाथ शहरात रविवारी कल्याणच्या आडीवली गावातील राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पनवेलचे पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचं उघडकीस आलं.

फडके यांच्यासह 32 जणांविरोधात गुन्हा दाखल

यानंतर पोलिसांनी फडके यांच्यासह एकूण 32 जणांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तर रात्री उशिरा पंढरीनाथ फडके, एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके या तिघांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

सर्व आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी

या तिघांना आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फडके यांच्याकडून पोलिसांविरोधात न्यायालयात तक्रार

दरम्यान, या घटनेत फक्त आमच्याच बाजूने नव्हे, तर राहुल पाटील यांच्या बाजूनेही आमच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी फक्त राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आपली तक्रार घेतली नसल्याची तक्रार पंढरीनाथ फडके यांनी त्यांचे वकील अॅड. सत्यन पिल्ले यांच्यामार्फत न्यायालयाकडे केली.

न्यायालयाने पोलिसांकडे उत्तर मागितलं

यावर न्यायालयाने पोलिसांचं म्हणणं मागवलं असून, त्यानुसार आता पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता परस्परविरोधी गुन्हे दाखल होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.