
हरियाणाच्या पानीपतमध्ये सायको किलर पूनम हिला अटक करण्यात आली आहे. चार लहान मुलांच्या हत्येप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सायको किलर केवळ लहान मुलांनाच टार्गेट करायची. त्यामागचं कारण हस्यास्पद असलं तरी गुन्हा मात्र भयंकर आहे. लहान मुलं आपल्यापेक्षा सुंदर दिसतात म्हणून ती या मुलांना टार्गेट करायची. त्यांचा खून करायची. आपल्यापेक्षा कुणीही सुंदर दिसता कामा नये. मीच तेवढी सुंदर दिसली पाहिजे, असं तिला वाटायचं. त्यामुळेच ती सुंदर दिसणाऱ्या लहान मुलांना टार्गेट करायची. नात्यागोत्यातील मुलांना ती सर्वात जास्त टार्गेट करायची. खून केल्यानंतरही तिच्यावर कुणाचा संशय जात नव्हता. पण तिने एक चूक केली आणि तिला अटक करण्यात आली. तिचा संपूर्ण खेळच खल्लास झाला. ती चूकच झाली नसती तर सायको पूनम कधीच सापडली नसती अन् ती एकावर एक खून करत सुटली असती.
सायको पूनम ही उच्चशिक्षित आहे. तिने राज्यशास्त्रात एमए केलं आहे. तिला चांगली समज आहे. पण सौंदर्याचं खूळ तिच्या डोक्यात बसलं आणि ती खून झाली. तिने नात्यातीलच एकामागून एक खून केले. भावाच्या मुलीलाही सोडलं नाही. खून करण्याची तिची एक पद्धत होती. लहान मुलांना ती बाथ टब किंवा हौदात बुडवून मारायची. मुलं हौदात किंवा बाथ टबमध्ये पडून मेलीत असाच लोकांचा समज व्हावा आणि हा अपघाती मृत्यू आहे, असं लोकांना वाटावं हा तिचा त्यामागचा हेतू होता. तीन खूनात ती यशस्वीही झाली होती. पण चौथ्या खुनाच्यावेळी मात्र ती पकडल्या गेली आणि तिचा खेळ संपला. पूनमची रवानगी थेट कोठडीत झाली.
चौथ्या खुनावेळी काय घडलं?
1 डिसेंबर 2025 हा दिवस पूनमसाठी तिच्या क्रूरकर्माचा अंत ठरवणारा ठरला. नौल्था गावात एका लग्नाला पूनम गेली होती. तिथेच ती चौथी हत्या घडवून आणणार होती. या लग्न समारंभात मोठ्या जावेच्या अवघ्या सहा वर्षाच्या विधीला पाहून पूनम सैरभैर झाली. एवढी सुंदर मुलगी असूच कशी शकते? ही मुलगी माझ्यापेक्षाही अधिक सुंदर दिसतेच कशी? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात उठले आणि मत्सर आणि द्वेषाने ती पेटून उठली. त्याचवेळी तिने विधीला कायमचं संपवण्याचं ठरवलं. तिने एक प्लान तयार केला. ती विधीला छतावर बनवलेल्या खोलीत घेऊन गेली.
पूनमने विधीला पाणी भरलेला टब सरकवायला सांगितलं. विधी टब सरकवण्यासाठी जाताच पूनमने विधीची मुंडी पकडली आणि तिला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विधीने जीव वाचवण्यासाठी अटापिटा केला. तिने पाण्यात जोरजोरात हात मारले. त्यामुळे पूनमचे कपडे भिजले. तरीही विधीला मारल्यानंतरच पूनमने तिथून काढता पाय घेतला.
विधीला संपवल्यानंतर सायको पूनम धावतच खाली आली. त्यावेळी तिला भिजलेलं पाहून कुटुंबीयांनी विचारलं. त्यावेळी ती वेगवेगळे बहाणे देऊ लागली. अन् हीच चूक तिला महागात पडली. कुणाला सांगितलं तिच्या कपड्यावर दूध सांडलं. तर कुणाला सांगितलं की मला पीरियड्स आले. तर आताच मी कपडे धुवून आल्याने भिजले असं काही लोकांना तिने सांगितलं. प्रत्येकाला भिजण्याचं वेगवेगळं कारण तिने सांगितल्याने तिच्यावर अधिक संशय बळावला.
विधीचा मृतदेह ज्या टबमध्ये सापडला तो टब अत्यंत छोटा होता. त्यामुळे विधीचा टबमध्ये बुडून मृत्यू होण्याची शक्यताच नव्हती. तसेच बाथरूमचा दरवाजाही बंद होता आणि पूनमचे कपडेही भिजलेले होते. टब भोवती पाणी साचलेले होते. त्यामुळे सर्वांचा संशय विधीवरच गेला.
सीसीटीव्हीने तर….
विधीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी तात्काळ घराच्या आजूबाजूला लागलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात पूनम येताना जाताना दिसत होती. कुटुंबीयांनीही पूनमच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे संशयाच्या बळावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिची उलटतपासणी सुरू केली. सुरुवातीला तिने पोलिसांनाही बहाणे देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवला तेव्हा मात्र तिची बोबडी वळली. पूनमने केवळ विधीच्याच खुनाची नव्हे तर इतर तीन मुलांच्या खुनाचीही कबुली दिली आणि ते खून कसे केले याची माहितीही दिली.
प्रत्येक हत्येनंतर सेलिब्रेशन
पूनमने पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एसपी भूपेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम प्रत्येक हत्येनंतर सेलिब्रेशन करायची. दुसऱ्यांचं सौंदर्य पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात जायची. आपल्या नात्यात माझ्यापेक्षा कुणीच सुंदर असू नये असं तिला वाटायचं. त्यामुळेच तिने एक एक करून लहान मुलांना संपवण्याचा धडाका लावला होता, असं भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं.