पालकांनो सावधान, शाळांसमोर गांजा विक्री करणाऱ्यास अटक

आम्ही आता प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे तसेच पालक आणि शिक्षकांचे याबाबत प्रबोधन करणार आहोत असे एमएचबी पोलीसांनी म्हटले आहे.

पालकांनो सावधान, शाळांसमोर गांजा विक्री करणाऱ्यास अटक
GANJA
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 22, 2023 | 8:36 AM

मुंबई : हल्ली शाळकरी मुलांवर पालकांनी चांगले लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारण शाळकरी मुलांना अंमलीपदार्थ विकण्याचे एक रॅकेट पोलीसांनी उद्धवस्त केले आहे. मुंबई पोलिसांनी दहीसर येथील एका शाळेसमोरून गांजा विकणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अडीच हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे. पोलीसांनी तीन दिवस विविध शाळांच्या समोर वेष बदलून सापळा लावून या सराईत आरोपीला अटक केली आहे.

बोरीवली आणि दहीसर परिसरातील शाळकरी मुलांना हेरून त्यांना ड्रग्ज विकले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी शाळांसमोर सापळा रचला होता. अशात दहिसर परिसरात 17 फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहणाऱ्या एका इसमाला संशयावरून पोलिसांनी हटकले असता, तो घाबरून पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले. राजेश खांडेकर असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे अडीच हजार रूपये किंमतीचा 210  ग्रॅम गांजा सापडला असल्याचे एमएचबी पोलिसांनी हिंदूस्थान टाईम्सला सांगितले आहे.

वेष बदलून सापळा लावला

आम्ही तीन दिवस विविध शाळांच्या समोर वेष बदलून सापळा लावला होता. आम्ही दुकानात ग्राहक बनून आणि बसस्टॉपवर प्रवासी बनून सापळा रचला होता. राजेश आम्हाला काही सापडत नव्हता असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडळकर यांनी सांगितले.
अखेर सोमवारी दुपारी तीन वाजता दहीसर परिसरातील एका शाळेसमोर अनेक मुले बाहेर उभी असताना दहावीच्या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करताना आरोपीला पकडण्यात आले. तो कोणत्याही मुलांचा पालक असल्याचे वाटत नव्हता, आणि मुलांशी बोलण्याच्या प्रयत्न करताना पोलीसांना संशय आला त्यामुळे खांडेकरला अटक झाली. खांडेकरची झडती घेतली असता त्याच्या कडे पोलिसांना 210 ग्रॅम गांजा सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ विकले

आरोपी खांडेकर हा दहीसर पूर्वेकडील दौलतनगरचा रहिवासी असून त्याने अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ विकले असल्याचे कबूली दिली असून त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. राजेश सुरूवातीला विद्यार्थ्यांना गांजाची सवय लागण्यासाठी अत्यंत कमी प्रमाणातील गांजा मोफत द्यायचा अशीही माहीती उघडकीस आली आहे.

गांजा कुठून आणायचा याची चौकशी

पोलिस आता खांडेकर गांजा कुठून आणायचा याची चौकशी करीत आहेत. तो कुठल्या ड्रग्ज रॅकेट गॅंगचा सदस्य आहे का किंवा आणखी कोणकोण शाळेकरी मुलांना व्यसनाच्या आहारी लावण्याचा प्रयत्न करत आहे का याचा पोलीस शोध घेत असल्याचे कुडळकर यांनी सांगितले.आम्ही आता प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे तसेच पालक आणि शिक्षकांचे याबाबत  प्रबोधन करणार आहोत. विद्यार्थ्यांना असे कोणी फूस लावून गांजा किंवा इतर अमलीपदार्थ विकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनी पोलिसांना तक्रार करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.