मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो, त्यात माझी काय चूक? विजय मानेंची हायकोर्टात धाव

| Updated on: Sep 30, 2022 | 10:26 PM

विजय माने हे उच्च शिक्षित असून पुण्यात राहतात. दिसायला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसतात, म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात.

मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो, त्यात माझी काय चूक? विजय मानेंची हायकोर्टात धाव
एकनाथ शिंदेंचे डुप्लीकेट विजय मानेंची हायकोर्टात धाव
Image Credit source: social media
Follow us on

ब्रिजभान जैस्वार, TV9 मराठी, मुंबई : एकाच चेहऱ्याची अधिक माणसे असू शकतात. राजकीय व्यक्तींच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता चेहरा असेल, तर त्याची खूप चर्चा होते. सध्या राजकीय वर्तुळातील ‘सेम टू सेम’ चेहऱ्याची अधिक चर्चा आहे, ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे ड्युप्लीकेट विजय माने (Vijay Mane) यांची. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशी साम्य असल्यामुळे माने कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आक्षेप घेत माने यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली आहे.

केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसतो, त्यात माझा दोष काय? असा सवाल उपस्थित करीत माने यांनी स्वतःविरोधातील गुन्हा रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

पुणे पोलिसांना उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने पुणे पोलिसांना या संदर्भात नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर त्यांना 18 ऑक्टोबरपर्यंत आपलं उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबई हायकोर्टात आज न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालयाने हे निर्देश दिलेत.

मुख्यमंत्री समजून मानेंचा सन्मान

विजय माने हे उच्च शिक्षित असून पुण्यात राहतात. दिसायला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसतात, म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. लोक त्यांना बोलावतात. त्यांना मुख्यमंत्री शिंदे समजून मान दिला जातो. काही ठिकाणी त्यांची विडिओ क्लिप बनवून व्हायरल केली जाते.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा शिंदे समर्थकांचा आरोप

या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असा भास लोकांना होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा समर्थकांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री यांची प्रतिमा माने यांच्या व्यवहारामुळे मलिन होत असल्याचा आरोप शिंदे समर्थकांचा आहे.

या कारणातून शिंदे समर्थकांनी विजय माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात विजय मानेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी मानेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मात्र सदर गुन्हा रद्द करण्यासाठी विजय माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. माने यांच्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने संबंधितांना नोटीस जारी केल्या आहेत.