
पिंपरीत एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुजल सुनील मानकर असे या तरुणाचे नाव आहे. सुरुवातीला या तरुणाने कौटुंबिक कलहातून व आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचे बोललं जात होतं. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत होते. आता तपासामागे या मुलाच्या आत्महत्या मागील धक्कादायक कारण उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल हा पिंपरीतील एका नामांकित महाविद्यालयात BCA च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो मूळचा खेड तालुक्यातील होता. काही दिवसांपूर्वी सुजलची एका अॅपच्या माध्यमातून सहा तरुणांशी ओळख झाली. यानंतर त्या सहा तरुणांनी त्याला पिंपरीत भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्याचे नग्न व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर त्याला सातत्याने ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर त्या तरुणांनी सुजलकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यातील 35 हजार 500 रुपये सुजलने संशयिताना दिले. मात्र त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी होत होती. त्याला याचा मानसिक त्रास दिला गेला. या त्रासाला कंटाळून सुजलने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली.
याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (४७, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (२२), संदीप रोकडे (२०), आकाश चौरे (२०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (२०, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. पातोंडा, जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (१९, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील संशयित लोपेश पाटील आणि प्रथमेश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या याबद्दलचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.