Psycho Killer : पूनम तू असं का केलंस? आई, मामी, काकी, आत्या… प्रत्येक नात्याचा गळा घोटला; एक सणक डोक्यात बसली अन्…

हरियाणामधील पाणीपत येथील पूनमने नातेवाईक व स्वतःच्या मुलासह अनेक बालकांचे खून केले. सौंदर्याची ईर्ष्या हे तिच्या क्रूर कृत्यांमागे मुख्य कारण होते. नणंदेची मुलगी, पोटचा मुलगा, भाची आणि लग्नातील एका मुलीची अशा पद्धतीने हत्या केली. अखेर एका लग्नसोहळ्यात तिचा गुन्हा उघडकीस आला आणि पोलिसांनी तिला अटक केली.

Psycho Killer : पूनम तू असं का केलंस? आई, मामी, काकी, आत्या... प्रत्येक नात्याचा गळा घोटला; एक सणक डोक्यात बसली अन्...
सायको किलर पूनम
Updated on: Dec 04, 2025 | 3:23 PM

हरियाणातील पानीपतमधील पूनम नावाच्या महिलेचं प्रकरण सध्या देशात गाजत आहे. तिने प्रत्येक नात्याचा गळा घोटला. आई, मामी, काकी आणि आत्या या प्रत्येक नात्याला काळीमा फासणारं कृत्य पूनमने ( crime news) केलं आहे. एक सणक डोक्यात गेली. एक तिडीक मेंदूत बसली अन् ही बया एकामागून एक लहानग्या कच्च्याबच्च्यांचे खून करत सुटली. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं ती पोरं मारत सुटली. अखेर तिला पोलिसांनी पकडलं आहे. या सायको पूनमला आता तू असं का केलंस? असं विचारलं जात आहे.

सायको पूनमच्या हत्याकांड सत्राची सुरुवात 2023 पासून झाली. पूनम सासरी सोनीपतच्या बोहड गावात गेली होती. त्यावेळी तिने नणदेच्या मुलीला टबमध्ये बुडवून मारलं होतं. नणदेची लहानगी मुलगी आपल्यापेक्षा अधिक सुंदर आहे, असं तिला वाटत होतं. म्हणून तिने हे कृत्य केलं. आपल्यापेक्षा कोणीही सुंदर दिसू नये, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळेच ती सुंदर दिसणाऱ्या लहान मुलांना पाण्यात बुडवून मारत होती. त्याची सुरुवात तिने नात्यामधूनच केली होती.

चार निष्पापांचा बळी

धक्कादायक बाब म्हणजे आपल्यावर कुणी संशय घेऊ नये म्हणून तिने तिच्या सुंदर दिसणाऱ्या मुलालाही अशाच पद्धतीने बुडवून मारलं. भाची आणि पोटच्या गोळ्याला जीवे मारल्यानंतर पूनम धाय मोकलून रडलीही.  मुलांचा अपघाती मृत्यू झालाय असं भासवण्यासाठीच तिने रडण्याचं नाटक केलं. मुलीला वाचवण्याच्या नादात आपला मुलगाही बुडून मेलाय असा भास तिने निर्माण केला. त्यामुळे सर्वांनाच वाटलं ही घटना अपघाती झालीय. आणि कोणताही तपास न करता मृतदेह दफन करण्यात आले.

रात्री 2 वाजता उठली…

त्यानंतर पूनम 2025मध्ये तिच्या माहेरी सिवाह गावी गेली. तिथे तिने आत्याच्या नात्याचा गळा घोटला. भावाची मुलगी तिच्यापेक्षा सुंदर होती. तिला बघताच पूनमचा जळफळाट झाला. आपल्यापेक्षा ही मुलगी सुंदर असूच कशी शकते? या विचाराने तिला पछाडलं आणि तिने भाचीला मारण्याचा कट रचला. रात्री झोपण्यापूर्वी पूनमने भावाची मुलगी जियाला बोलावलं. आणि आज रात्री मी पूनम आतूकडेच झोपेल असं आईबाबांना सांग, असं तिला सांगितलं. त्यानंतर या निरागस मुलीनेही पूनम आतूकडेच झोपण्याचा हट्ट धरला.

त्यानंतर जिया पूनम सोबत झोपली. रात्री 2 वाजता पूनम उठली आणि तिने जियाला कडेवर घेऊन गोठ्यात गेली. तिथे तिने जियाला हौदात बुडवून मारलं. हा सुद्धा एक अपघात असल्याचं लोकांना वाटलं आणि त्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे पूनमची हिंमत वाढतच गेली.

एमए झाली, पण अक्कल…

सायको पूनमने पॉलिटिकल सायन्समधून एमए केलं होतं. पण ती अक्कलशून्य होती. 1 डिसेंबर 2025 रोजी एका लग्न सोहळ्याला ती गेली होती. तिथे तिने चौथी हत्या केली. त्यानंतर तिचं बिंग फुटलं आणि तिला अटक झाली. तिने लग्नात सहा वर्षाच्या विधीची हत्या करण्याचा प्लान केला. पूनम विधीला छतावर घेऊन गेली आणि तिथे तिला टबमधून बुडवून मारायला लागली. यावेळी विधीने सुटण्याचा प्रयत्न केला. दोघींची झटापट झाली. त्यात पूनमचे कपडे भिजले. विधीची हत्या केल्यानंतर ती धावतपळत खाली आली. तेव्हा कुटुंबातील लोकांनी तुझे कपडे कसे काय भिजले म्हणून विचारलं. त्यावर ती प्रत्येक महिलेला वेगवेगळी कारणं सांगू लागली. तिच्या बोलण्यावर संशय आल्याने तिचं बिंग फुटलं. अन् तिला तुरुंगात जावं लागलं.