संतापजनक ! कर्जाचा हप्ता वेळेत दिला नाही, रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !

रिकव्हरी एजंट वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. या वादानंतर एजंटने शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले.

संतापजनक ! कर्जाचा हप्ता वेळेत दिला नाही, रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !
रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 12:54 AM

रांची : कर्जवसुलीसाठी कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याऐवजी काही फायनान्स कंपन्या कर्जदारांना किती अमानुष त्रास देतात, याची प्रचिती एका घटनेतून आली आहे. झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने एका गर्भवती महिलेला (Pregnant Women) ट्रॅक्टरखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. कर्जाचा हप्ता भरायला उशिर केल्याच्या किरकोळ कारणावरून रिकव्हरी एजंटने (Recovery Agent) हा अतिरेक केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना गुरुवारी इचक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

गर्भवती महिला दिव्यांग शेतकऱ्याची मुलगी!

मृत महिला ही एका दिव्यांग शेतकऱ्याची मुलगी असून ती तीन महिन्यांची गर्भवती होती. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज रतन चोथे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रिकव्हरी एजंट वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. या वादानंतर एजंटने शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले. त्यात गर्भवती महिलेला हकनाक बळी गेला.

ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण

कर्जाचा हप्ता वेळीच भरला नाही म्हणून एखाद्याचा जीव घेण्याच्या रिकव्हरी एजंटच्या कृत्यावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे इचक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी हजारीबाग शहरातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मोठ्या संख्येने घेराव घातला. यावेळी आरोपीला वेळीच अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसेच मृत गर्भवतीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

चौघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल

या प्रकरणात रिकव्हरी एजंट आणि खाजगी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीचे अधिकारी तिला न सांगता तिच्या घरी आले. यावेळी गर्भवती महिला ट्रॅक्टरसमोर उभी होती.

यादरम्यान झालेल्या वादात रिकव्हरी एजंटने थेट तिला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेचा हजारीबागच्या स्थानिक पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत असून सर्व आरोपींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्याचवेळी संबंधित फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापनानेही तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.