नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं, लैंगिक छळ आणि… नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार

नागपूरच्या एका महिलेला गलेलठ्ठ पगाराच्या आमिषाने पोर्तुगालमध्ये नोकरीसाठी पाठवण्यात आले. तिथे तिची विक्री करून लैंगिक व शारीरिक छळ करण्यात आला. कशाबशा भारतात परतल्यावरही तिला धमक्या व पैशाची मागणी करण्यात आली.

नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं, लैंगिक छळ आणि... नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार
police
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 2:57 PM

गलेलठ्ठ पगाराच्या आमिषामुळे नागपूरची एक महिला पोर्तुगालमध्ये नोकरीसाठी गेली. तिथे जाताच तिची विक्री करण्यात आली. या महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला. मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या नवऱ्यालाही धमकावण्यात आलं. अचानक घडलेल्या प्रकारामुळे ही महिला आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

नागपूरमधील ही 28 वर्षीय महिला आहे. तिला दीड लाख रुपये पगार देण्याचं अमिष दाखवण्यात आलं होतं. पुण्याच्या एका कन्सल्टंट एजन्सीने हे अमिष दाखवलं होतं. सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याऐवजी पोर्तुगालमधील बिअर शॉप मालकाला महिलेला विकल्याचा धक्कादायक आरोप आहे. त्यामुळे ही महिला पोर्तुगालला गेली. पण तिथे तिला बियर शॉपच्या मालकाला विकण्यात आलं. तिच्याकडून तिथे जबरदस्तीने काम करून घेण्यात आलं. तिचं शारीरिक आणि मानसिक शोषणही करण्यात आलं. मालकाच्या घरी ठेवून तिचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे. ‘तुला खरेदी करण्यासाठी भारतातील एजंटना पैसे दिले आहेत’, असं बिअर शॉप मालकाने सांगितल्याचा महिलेचा दावा आहे.

इन्स्टाग्रामवरून ओळख

ही महिला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पुण्यातील एका कन्सल्टन्सीच्या संपर्कात आली होती. तिला कंपनीच्या लोकांनी पोर्तुगालमध्ये कॅशियरची नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. महिन्याला दीड लाख रुपये पगार मिळेल आणि आठ तासाची नोकरी राहील असंही सांगितलं. त्यामुळे ही महिला आणि तिच्या घरातील लोक खूश झाले. आता घरातील आर्थिक चणचण संपेल असं त्यांना वाटू लागलं. एवढं मोठं पॅकेज मिळतंय म्हटल्यावर सदर महिला ही कंपनीच्या जाळ्यात आली. व्हिसा आणि इतर कागदपत्र तयार करण्याच्या नावाखाली या महिलेकडून टप्प्या टप्प्याने 11 लाख रुपये वसूल करण्यात आले.

पण ही महिला पोर्तुगालला गेल्यावर कहाणी संपूर्णपणे बदलून गेली. महिला पोर्तुगालला जाताच एजंटांनी तिचा पासपोर्ट हिरावून घेतला. त्यानंतर तिला दोन दिवस एका खोलीत बंद करून ठेवलं. त्यानंतर या महिलेला बियर शॉपच्या मालकाला विकलं. तिथे तिच्याकडून जबरदस्तीने काम करून घेण्यात आलं. या महिलेने त्याला विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आलं.

अन् निसटली…

महिलेने त्यांना पासपोर्ट मागितल्यावर आरोपींनी तिच्याकडे पैशाची मागणी केली. एक महिनाभर हा अत्याचार सहन केल्यानंतर या महिलेला तिथून निसटण्याची संधी मिळाली. तिथून निसटताच आधी ती पोर्तुगालहून बसने लिस्बनला गेली. नंतर मॅड्रिडला आली. त्यानंतर ती दोहा मार्गे कशी तरी भारतात पोहोचली.

भारतात आल्यावरही त्रास

भारतात पळून आल्यावरही तिची ससेहोलपट संपली नाही. कन्सल्टन्सीशी संबंधित लोकांनी तिला पुन्हा तीन लाख रुपये मागितले. तिला परत माल्टामध्ये नोकरी देण्याचं अमिष दाखवलं. तिने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेने वैतागून पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या कन्सल्टन्सीच्या संचालकासहीत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर मानवी तस्करी, फसवणूक आणि जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us