
Vaishnavi Agawane : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आलाय, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याच वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लग्न करून मी चूक केली, असं वैष्णवी म्हणताना दिसत आहे. “मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केलं नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असं म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत म्हणत होती,” असं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.
तसेच, मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीपण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितलं आहे. आपण त्यावर विचार करू, असं मला पप्पांनी सांगितलं आहे, असंही वैष्णवीच्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत.
मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे, असंही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. 16 मे 2025 रोजी तिने तिच्या आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे तसेच नंदेकडून तिचा जाच केला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक यांचा प्रेमविवाह होता. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. तसेच फॉर्च्यूनर गाडीही दिली होती. यासह महागडी भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं. तरीदेखील तिचा जाच केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.
(टीप- टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)