शरद मोहोळच्या काटा काढण्यासाठी सात दिवसांपूर्वी गँगमध्ये आला, संधी साधत केली हत्या

Sharad mohol murder case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली गेली. शरद मोहोळ याची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली? हे कारण पुढे आले आहे.

शरद मोहोळच्या काटा काढण्यासाठी सात दिवसांपूर्वी गँगमध्ये आला, संधी साधत केली हत्या
| Updated on: Jan 06, 2024 | 9:44 AM

पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या झाली. त्यानंतर पुणे शहरात पुन्हा गँगवारचे ढग दिसून आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन पथके रवाना केले होती. त्यानंतर काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे. सात दिवसांपूर्वीच तो गँगमध्ये आला. त्यानेच त्याचा संधी साधत गेम केला. मोहोळ याच्या तुतारदरा येथील कार्यालयासमोरच हा प्रकार घडला. हल्लेखोरांना झाडलेल्या चार गोळ्यांच्या पुंगळ्या पोलिसांना घटनास्थळी मिळाल्या आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.

अशी साधली संधी

शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवास पाच जानेवारी रोजी होता. त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्याऱ्यांची गर्दी होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी तो कार्यालयातून बाहेर पडला. इतक्यात गर्दीतून चार जण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर बेछूट गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. त्याच्या खांद्याला गोळ्या लागल्या. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.

जमिनीचा वादातून हत्या

शरद मोहोळ आणि साहिल पोळेकर याच्यात जमिनीचा आणि पैशांचा वाद होता. त्या वादातून ही हत्या झाली. साहिल पोळेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेची 9 तपास पथके तयार करुन आरोपींना शोधून काढले. पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूर परिसरात आरोपी मिळाले. पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.