
Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील विवाहिती वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लग्नात 51 तोळे सोनं, एक फॉर्च्यूनर कार तसेच चांदीची भांडी देऊनही वैष्णवीचा छळ चालूच होता. असे असतानाच आता हगवणे कुटुंबीयांची दुसरी सून मयुरी हगवणे यांनी पुढे येत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यानंतर मयुरी यांच्या माहेरच्या मंडळींनीही समोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. आमच्या मयुरीचीही वैष्णवीसारखीच परिस्थिती झाली असती, असा खळबळजनक दावाच मयुरीच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
मयुरी जगताप यांची आई तसेच बंधू यासह वैष्णवी हगवणे हिचे आई-वडील यांनी एकत्र येत टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. या संवादात या दोन्ही कुटुंबांनी हगवणे कुटुंबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. या संवादादरम्यान हगवणे कुटंबाची मोठी सून मयुरी यांच्या कुटुंबीयांनाही हुंड्यासाठी विचारणा झाली होती का? असे विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना मयुरी यांच्या भावाने अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
हगवणे कुटुंबाचे जास्त भांडण हे वैष्णवी हिच्याशीच होते. आमच्याकडे हुंड्यांची मागणी केली असती, पण झालं असं की वैष्णवीशी जसे त्यांची भांडणं वाढत गेली तसं मयुरी आणि तिचा पती हे वेगळं राहू लागले. त्यामुळे हगवणे कुटुंबाने त्यांची मयुरी आणि तिच्या नवरऱ्याची आर्थिक मदतच थांबवून टाकली. ते एकत्र राहिले असते तर आज जे वैष्णवीसोबत झालं तेच मयुरीसोबतही झालं असंत, असं खळबळजनक माहिती मयुरी हगवणे यांचे बंधू मेघराज जगताप यांनी सांगितले.
माझं सुशील हगवणे यांच्याशी 2022 साली लग्न झालं. माझी नणंद, दीर, सासू हे कायम मला त्रास द्यायचे. माझ्या सासून लाड केले तर नणंद तिचे लाड करायला नको, असं सांगायची. त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन त्रास दिला. पण या सर्वांमध्ये चांगली बाब म्हणजे माझ्या पतींनी मला कायम साथ दिली. त्यांनी त्यांच्या मुलालाही मारहाण केलेली आहे. माझे पती माझी बाजू घ्यायचे म्हणून हगवणे कुटुंबाने त्यांनाही मारहाण केलेली आहे. आम्ही दीड वर्षांपासून वेगळे रहात होतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट मयुरी जगताप यांनी केला आहे.