
Vaishnavi Hagawane Suicide Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. सासरच्या मंडळींकडून त्रास झाल्याने तसेच वडिलांकडून दोन कोटी रुपये आण असा धोशा लावल्याने शेवटी वैष्णवी हगवणे हिने स्वत:ला संपवलं आहे. तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून मात्र धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. तिच्या अंगावर जखमा आहेत, त्यामुळेही तिचा मृत्यू झालेला असू शकतो, असं अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मृत वैष्णवी हगवणे हिचा सासरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार हे पुण्यात एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले. ज्या मुलीने आत्महत्या केली तिची सासू, नणंद आणि नवरा हे तुरुंगात आहेत. सासरा पुळून पळून जाईल. या सासऱ्याला पकडण्यासाठी तीन पथकं स्थापन करण्यात आली आहेत. आता तीन नव्हे तर सहा पथकं सोडा पण त्याच्या मुसक्या बांधून आणा असा मी आदेश दिला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
तसेच, या प्रकरणात माझे नाव घेतले जात आहे. पण माझा यात काहीही संबंध नाही. आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक आहोत. प्रेमापोटी आम्हाला लग्नाला जावं लागतं. आम्ही लग्नाला गेलो नाही तर लोक रुसून बसतात, असंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
तसेच, आपली बाजू मांडतानात त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. मी महिलांचा सन्मान करतो. मीच पठ्ठ्याने राज्यातल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायला सुरुवात केली. याआधी कोणत्याही माईच्या लालने ही योजना नव्हती आणली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी अशा तिघांनी ही योजना सुरू केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एखादा प्रस्ताव आणला तर महिलांच्या प्रगतीचा प्रस्ताव मी एका मिनिटात मंजूर करतो, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच पण माला जाब विचारला जात आहे, अशी खंतही व्यक्त करत या प्रकरणात माझा संबंध असेल तर मला खुशाल फासावर लटकवा, असं आव्हानच अजित पवार यांनी दिलंय.