डोक्यात टपली मारली म्हणून जाब विचारला, संतापलेल्या दोघांचा रिक्षाचालकावर हल्ला

डोंबिवली स्टेशनजवळ इंदिरा चौकात रिक्षाचालक उभे असताना तेथे दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यांनी रिक्षाचालकाच्या डोक्यात टपली मारली. यावरुन वाद विकोपाला गेला.

डोक्यात टपली मारली म्हणून जाब विचारला, संतापलेल्या दोघांचा रिक्षाचालकावर हल्ला
दुचाकीस्वाराकडून रिक्षाचालकावर हल्ला
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 21, 2023 | 1:32 PM

डोंबिवली / सुनील जाधव : टपली मारल्याचा जाब विचारला म्हणून दोघांनी रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज सकाळी डोंबिवली स्टेशनजवळ घडली. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. डोंबिवली स्टेशन जवळील इंदिरा चौकात सकाळच्या सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिताराम शेवाळे असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. आरोपींविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

डोंबिवली स्टेशनजवळील इंदिरा चौकात घडली घटना

रिक्षाचालक सिताराम शेवाळे हे डोंबिवली पूर्वेतील स्टेशनजवळील इंदिरा चौकात उभे होते. यावेळी दुचाकीवरुन दोघे जण आले आणि शेवाळे यांना टपली मारुन पुढे गेले. शेवाळे याबाबत जाब विचारण्यास गेले असता दोघांनी त्यांच्यावर चाकूहल्ला केला. यानंतर आरोपी तेथून पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्यात शेवाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

रामनगर पोलिसात आरोपींविरोधात भादवी कलम 326 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन आरोपीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळी इतर रिक्षा चालक उपस्थित होते. मात्र कोणीही त्यांच्या मदतीला गेले नाही. आरोपींच्या दुचाकीच्या नंबर प्लेटचा फोटोही काढला नाही. अशी कोणती घटना घडत असताना नागरिकांनी संबंधित व्यक्तीची मदत करत किंवा वाहनाच्या प्लेटचा फोटो काढला पाहिजे, असे आवाहन रामनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.