
दिल्ली : ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा राहत्या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुडगाव येथे घडली आहे. रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अपार्टमेंटचे रेलिंग 3.5 फूट असून, यावरुन अचानक पडणे अनैसर्गिक दिसते, असे गुरुग्रामचे पोलिस उपायुक्त (पूर्व) वीरेंद्र विज यांनी सांगितले. रमेश अग्रवाल यांच्या घरी नेमके काय घडले? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. वडिलांच्या निधनानंतर रितेश अग्रवाल खूप भावूक झाले आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रितेश अग्रवाल म्हणाले की, जड अंतःकरणाने मी आणि माझे कुटुंबीय सांगू इच्छितो की आमचे मार्गदर्शक, माझे वडील रमेश अग्रवाल यांचे 10 मार्च रोजी निधन झाले. त्यांनी पूर्ण आयुष्य जगले आणि मला आणि आपल्यापैकी अनेकांना दररोज प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांचे शब्द आयुष्यभर आपल्या हृदयात गुंजत राहतील. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्वांना आमच्या खाजगी गोष्टींचा आदर करण्याची विनंती करतो.
डीएलएफ द क्रेस्ट कॉन्डोमिनियम इमारत
गुडगावमधील डीएलएफ द क्रेस्ट कॉन्डोमिनियममध्ये रमेश अग्रवाल आपल्या पत्नीसह राहत होते. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचा 7 मार्च रोजी विवाह झाला. या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अब्जाधीश गुंतवणूकदार आणि सॉफ्टबँकचे अध्यक्ष मासायोशी सोन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
घटना घडली तेव्हा रितेश आणि त्यांची पत्नीही घरी उपस्थित होते. मुलाच्या लग्नानंतर तीन दिवसात वडिलांच्या अशा जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घरी नवीन सुनेचे स्वागत होत असतानाच घडलेल्या या घटनेने सर्वच हादरुन गेले. शवविच्छदेनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.