
लग्नाच्या अवघ्या 10 दिवसात पतीला भयानक मृत्यू दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सोनम रघुवंशीबद्दल सतत नवनवीन खुलासे होत आहेत. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम हनिमूनच्या बहाण्याने पतीसोबत शिलाँगला गेली होती. इच्छेविरुद्ध लग्न झाल्याने ती या लग्नाबाबत खुश नव्हती. तिचं राज कुशवाह नावाच्या तरुणावर प्रेम होतं, परंतु घरच्यांनी बळजबरीने तिचं लग्न राजाशी लावून दिलं होतं. म्हणूनच तिने प्रियकर आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता. लग्नानंतर सोनम राजाला तिच्या जवळ येण्यापासून सतत रोखत होती. इतकंच नव्हे तर तिने राजासमोर एक विशेष अटसुद्धा घातली होती.
लग्नानंतर सोनम राजासोबत तिच्या सासरच्या घरी फक्त चार दिवस राहिली होती. त्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. सोनमने तिच्या सासरी राहत असताना बॉयफ्रेंड राज कुशवाहला मेसेज करून सांगितलं होतं की तिला पती राजाचं जवळ येणं आवडत नव्हतं, असं वृत्त ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलंय. राजा आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. त्यानंतर 20 मे रोजी ते हनिमूनसाठी गेले होते.
या हनिमून ट्रिपसाठी राजा सुरुवातीला तयार नव्हता. परंतु सोनमने हनिमूनला जाण्यासाठी राजाची मनधरणी केली आणि त्याला न सांगताच तिकिटंदेखील बुक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने राजाला सांगितलं की आधी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेईल. त्यानंतरच ती शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देईल. खरंतर सोनमला राजाच्या हत्येचं प्लॅनिंग आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्सना तिथे पोहोचण्यासाठी वेळ घालवायचा होता. म्हणूनच ती विविध कारणं देऊन राजासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होते. अखेर तिने कामाख्या देवीच्या दर्शनाची अट राजासमोर ठेवली.
सोमवारी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून सोनमला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिलाँग पोलिसांनी तिला ट्रान्झिट रिमांडमध्ये ठेवलंय. याप्रकरणी सोनमचा प्रियकर आणि इतर तीन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. सोनम, तिचा प्रियकर आणि इतर तीन आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर येऊ शकेल.