कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर

| Updated on: Jul 06, 2021 | 3:00 PM

बुलेट गाडीला कंपनीने दिलेला सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश्श आणि कानठळ्या बसवणारा सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी केली होती.

कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर
अंबरनाथमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाई
Follow us on

अंबरनाथ : बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरवर आज अंबरनाथमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 150 पेक्षाही जास्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. (Thane Ambernath Police Destroys loud horn and modified silencers under Road Roller)

बुलेट गाडीला कंपनीने दिलेला सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश्श आणि कानठळ्या बसवणारा सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी केली होती. त्याची दखल घेत कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर ही कारवाई सुरु करण्यात आली होती.

कल्याण कर्जत राज्य महामार्गावर कारवाई

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वाहतूक शाखेने कारवाई करत नाकाबंदी दरम्यान 150 पेक्षा जास्त बुलेटचे सायलेन्सर कापून जप्त केले होते. तर अनेक गाड्यांचे प्रेशर हॉर्न सुद्धा जप्त करण्यात आले होते. या सगळ्यावर आज अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर कारवाई करण्यात आली.

साईबाबा नाक्याजवळ हे सगळे सायलेन्सर रस्त्यावर ठेवून त्यावरुन रोड रोलर फिरवण्यात आला. या कारवाईवेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्य्क पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड, अंबरनाथ विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, उल्हासनगर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तर बघ्यांनी सुद्धा या कारवाईवेळी मोठी गर्दी केली होती.

पोलिसांचं बाईकस्वारांना आवाहन

मॉडिफाइड सायलेन्सवर सुरु करण्यात आलेल्या या कारवाईत आत्तापर्यंत आठशेपेक्षा जास्त सायलेन्सर्सवर रोड रोलर फिरवण्यात आला असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. तसंच ही कारवाई करणं ही पोलिसांची मजबुरी असून कारवाई टाळायची असेल, तर ज्यांनी मॉडिफाइड सायलेन्सर लावले असतील, त्यांनी ते स्वतःहून काढून टाकावेत असं आवाहनही त्यांनी केलं. हे सायलेन्सर जे गॅरेजवाले बसवून देतात, त्यांच्यावरही कडक कारवाई सुरु करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बाळासाहेब पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या :

फॅन्सी नंबर प्लेटवाले पुन्हा ट्रॅफिक पोलिसांच्या रडारवर

VIDEO | रोड रोलरखाली कर्कश्श हॉर्न आणि सायलेन्सर चिरडले, लातूर पोलिसांचा धमाका

(Thane Ambernath Police Destroys loud horn and modified silencers under Road Roller)