Isro Scientist : इस्रोच्या बेपत्ता शास्त्रज्ञाचा पोलिसांनी लावला थांगपत्ता; 7 दिवसानंतर पुरी रेल्वे स्थानकावरून घेतले ताब्यात

एटीएममधून पैसे काढल्याचा संदेश मोबाईलवर येताच कुटुंबीयांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ओडिशा पोलिसांच्या मदतीने शास्त्रज्ञाला ओडिशाच्या पुरी रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतले.

Isro Scientist : इस्रोच्या बेपत्ता शास्त्रज्ञाचा पोलिसांनी लावला थांगपत्ता; 7 दिवसानंतर पुरी रेल्वे स्थानकावरून घेतले ताब्यात
इस्रोच्या बेपत्ता शास्त्रज्ञाचा पोलिसांनी लावला थांगपत्ता
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 15, 2022 | 1:41 AM

अहमदाबाद : अहमदाबादहून सूरजपूरला जात असताना बेपत्ता (Missing) झालेला इस्रोचा तरुण शास्त्रज्ञ (Scientist) अखेर पुरीमध्ये सापडला आहे. मागील सात दिवस या शास्त्रज्ञाचा शोध घेतला जात होता. अखेर ओडिशातील पुरी रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी शास्त्रज्ञाला ताब्यात (Detained) घेतले आहे. रक्षाबंधन सण साजरा करून तो आपल्या गावी परतत होता. पोलीस त्याच्या मोबाईल तसेच बँक खात्यातून पैसे काढण्यावर पाळत ठेवून होते. याचदरम्यान बेपत्ता शास्त्रज्ञाने एटीएममधून त्याच्या खात्यातून पैसे काढले. नेमका याचवेळी शास्त्रज्ञाचा ठावठिकाणा लागला आणि पोलीस पथकाने तेथे जाऊन त्या शास्त्रज्ञाला ताब्यात घेतले. आठवडाभराच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना त्याचा थांगपत्ता लावण्यात यश मिळाले. पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे शास्त्रज्ञाचा शोध लागल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

6 ऑगस्टपासून मोबाईल बंद; कुटुंबीय होते प्रचंड चिंतेत

एटीएममधून पैसे काढल्याचा संदेश मोबाईलवर येताच कुटुंबीयांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ओडिशा पोलिसांच्या मदतीने शास्त्रज्ञाला ओडिशाच्या पुरी रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतले. दीपक पाईक्रा (27) असे शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते सूरजपूर जिल्ह्यातील लाटोरी चौकीअंतर्गत कास्केला गावातील रहिवासी आहेत. ते 2018-19 पासून इस्रो अहमदाबादमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त आहेत. ते 5 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी अहमदाबादहून त्यांच्या गावी कास्केला येथे आले होते. 6 ऑगस्ट रोजी शास्त्रज्ञ नागपुरात पोहोचल्याची माहिती मिळाली. मात्र तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे सर्वच जण चिंतेत सापडले होते. दीपक यांच्या जीविताचे काही बरे-वाईट तर घडले नाही ना, अशी काळजी कुटुंबियांना हैराण करून सोडत होती.

बँक खात्यातून पैसे काढताच लागला सुगावा

शास्त्रज्ञ दीपक यांचे शेवटचे लोकेशन ओडिशातील पुरी येथे असल्याचे सांगितले जात होते. दीपक हे गायब असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक रामकृष्ण साहू यांच्या सूचनेवरून लाटोरी पोलिसांचे पथक कुटुंबीयांसह पुरी येथे पोहोचले होते. बेपत्ता शास्त्रज्ञ दीपक हे हॉटेल ब्लू मूनमध्ये थांबले होते, परंतु ते हॉटेलमध्ये कुणाला काही न सांगता निघून गेले होते, असे पुरीमध्ये पोहोचलेल्या पोलीस पथकाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर 8 ऑगस्टपासून मोबाईल बंद असल्याने शास्त्रज्ञ दीपक यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. शनिवारी दुपारी अडीच वाजता दीपक यांनी त्यांच्या खात्यातून तीन हजार रुपये काढले. त्यानंतर घरच्यांना मोबाईलवर मेसेजद्वारे याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी तत्काळ लातोरी चौकीचे प्रभारी धनंजय पाठक यांना माहिती दिली. त्यानंतर चौकीच्या प्रभारींनी तत्काळ ओडिशाच्या सी-बीच स्टेशन, पुरीच्या प्रभारींना याची माहिती दिली. माहिती मिळताच पुरी सी-बीच स्टेशन प्रभारी तात्काळ टीमसह घटनास्थळी गेले आणि त्यांनी बेपत्ता शास्त्रज्ञ दीपक यांना पुरी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. (The missing ISRO scientist was taken into custody by the police from Puri railway station)