Dombivli Crime : दुकानासमोर हातगाडी लावणाऱ्या महिलांचा व्हायचा त्रास, काटा काढण्यासाठी त्याने थेट ….

| Updated on: Sep 11, 2023 | 5:05 PM

बुरखाधारी गुन्हेगारांनी फेरीवाल्या दोन महिलांना बेदम मारहाण केली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे त्या आरोपींना अखेर अटक करण्यात आली असून मोठा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे.

Dombivli Crime : दुकानासमोर हातगाडी लावणाऱ्या महिलांचा व्हायचा त्रास, काटा काढण्यासाठी त्याने थेट ....
Follow us on

डोंबिवली | 11 सप्टेंबर 2023 : डोंबिवलीत दोन महिलांना बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण शहर हादरलं. टाटा नाका परिसरात हातगाडी लावणाऱ्या दोन महिलांना बुरखाधारी टोळक्याने बेदम मारहाण (woman beaten up) केली होती. मात्र याप्रकरणी पोलिसांनी अथक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता जी माहिती समोर आली ती ऐकून पोलिसही हादरले. त्या महिलांना मारहाण्याची सुपारी त्यांच्या शेजारी दुकान चालविणाऱ्या इसमानेच दिली होती, अशी कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी आरोपी दुकानदार विशाल राठोड सह मिलिंद नागवंशी, प्रविण जाधव, बाळा शेळके अशा चौघांना अटक करत पुढील कारवाई सुरू केली आहे

असं काय झालं की दिली थेट सुपारी ?

डोंबिवली पूर्वेकडील टाटा नाका परिसरात देशमुख होमच्या बाजूला मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करतात. या ठिकाणी अनेक प्रकारची दुकाने असतात. याच भागात रोशनी सिंग आणि चांदनी सिंग या दोन्ही बहिणींची देखील हातगाडी लावलेली असते. मात्र त्यांच्या हातगाडीमुळे शेजारीच दुकान असलेल्या विशाल राठोड याला नेहमी त्रास होत असे. त्यांच्याच बरेच वेळा वादही होत असे. काही दिवसांपूर्वी रोशनी व चांदनी या दोघी त्यांच्या हातगाडीजवळ उभ्या असतानाचा काही बुरखाधारी तरुण त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी अचानकच त्या दोघींना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यांनी त्या दोघींना एवढे मारले की त्या दोघी जागीच बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपी फरार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली व याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र हल्लेखोरांनी बुरखा घातल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. अखेर याप्रकरणी मानपाड पोलिसांनी काही खबरींच्या मदतीने माहिती काढली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशी दरम्यान शेजारी दुकान चालविणाऱ्या विशाल राठोड यानेच रोशनी व चांदनी यांना मारण्याची सुपारी दिल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी दुकान चालक विशाल राठोड सह मारहाण करणारे मिलिंद नागवंशी, प्रविण जाधव, बाळा शेळके यांना अटक करत पुढची कारवाई सुरू केली.