अचानक केबल तुटली अन् लिफ्ट 25 व्या मजल्यावरुन खाली आली, मग…

| Updated on: Mar 18, 2023 | 5:37 PM

विजयवाडा थर्मल पॉवर स्टेशनमध्ये केबल तुटल्याने 25 व्या मजल्यावरुन लिफ्ट खाली कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अचानक केबल तुटली अन् लिफ्ट 25 व्या मजल्यावरुन खाली आली, मग...
लिफ्टमध्ये एकाच कुटुंबातील आठ जण अडकले
Image Credit source: TV9
Follow us on

विजवाडा : आंध्र प्रदेशच्या विजयवाडा परिसरात थर्मल पॉवर स्टेशनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्टची केबल तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यामध्ये तीन जणांना प्राण गमवावा लागला. लिफ्टमध्ये एकूण आठ लोक होते. त्यातील उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले गेले. लिफ्ट खूप उंचीवरून खाली पडल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या लिफ्ट देखभालीच्या कामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप असून, त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने थर्मल पॉवर स्टेशनमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी

लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची बातमी समजताच थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. लिफ्टमध्ये अडकलेले लोक जोरजोरात ओरडून मदतीसाठी धावा करत होते. त्यांच्या आवाजाच्या दिशेने कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर क्रेन बोलावून लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

वेळीच मदत पोहोचल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. मात्र तिघांना जबर मार लागल्यामुळे जागीच प्राणाला मुकावे लागले. जखमी लोकांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. या घटनेने लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या घटनेला कारणीभूत ठरलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी देखील कर्मचारी वर्गातून करण्यात येत आहे. पोलिसांनी सध्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू ठेवला आहे.

हे सुद्धा वाचा