रंकाळा तलावाजवळ सर्वांसमोर खुलेआम तरुणावर निर्घृण हल्ला, कोल्हापूर टोळीयुद्धाने हादरलं

| Updated on: Apr 04, 2024 | 8:34 PM

कोल्हापुरात रंकाळा चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यांसमोर एका तरुणावर तीन ते चार जणांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. हा सगळा प्रकार रंकाळा चौपाटीवर असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांसमोर घडला.

रंकाळा तलावाजवळ सर्वांसमोर खुलेआम तरुणावर निर्घृण हल्ला, कोल्हापूर टोळीयुद्धाने हादरलं
Follow us on

पुण्यात भर दिवसा गुंड शरद मोहोळ याची हत्या केल्याच्या घटनेला आता जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. असं असतानाही राज्यात गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसताना दिसत नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरात आज संध्याकाळच्या सुमारास कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतील, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात रंकाळा चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यांसमोर एका तरुणावर तीन ते चार जणांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. हा सगळा प्रकार रंकाळा चौपाटीवर असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांसमोर घडला. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे.

संबधित घटना ही आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. रंकाळा चौपाटीवर नेहमीप्रमाणे नागरीक आणि पर्यटकांची गर्दी होती. यावेळी अचानक एका तरुणाचा पाठलाग करत तीन ते चार जण धावत-धावत आले. त्यांनी तरुणावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे रंकाळा चौपाटीवर एवढी वर्दळ असताना हा प्रकार घडला. त्यामुळे आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही, हे स्पष्ट होताना दिसत आहे.

टोळी युद्धातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाचं नाव अजय शिंदे असं होतं. तो 30 वर्षांचा होता. मृतक अजय शिंदे हा देखील एक गुंड होता, अशी माहिती समोर येत आहे. अजय शिंदे हा यादव नगरात वास्तव्यास होता. यादव नगरातीलच टोळी युद्धातून ही हत्येची घटना घडली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत.

संबंधित हत्येच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अजय शिंदे या तरुणाची आरोपींनी हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. अजय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचीदेखील माहिती मिळत आहे.